लग्नाच्या काही मिनिटे आधी नवरदेवाचा ह्रदयविकाराने मृत्यू

3

सामना ऑनलाईन । सांगली

लग्न हा विधी प्रत्येक माणसाच्या जीवनातील आनंदाचा क्षण असतो. मात्र लग्नाच्या बेडीमध्ये अडकण्याआधी नवरदेवाला मृत्यूने कवटाळल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील मिरज येथे घडली आहे. रवी मदन पिसे (२७) असे मृत्यू झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. आज (शनिवारी) सकाळी ही घटना घडली.

लग्नाला काही तासांचा अवधी शिल्लक असताना रवी मदने यांचा तीव्र ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मिरजमध्ये रवी यांचा आज (शनिवार) कोल्हापूर येथील मुलीशी विवाह होता. लग्नासाठी नवरदेवाबरोबर वऱ्हाडीमंडळींची सर्व तयारी झाली होती. सकाळी ९च्या सुमारास भावी जोडीदारांचा हळदीचा कार्यक्रम पार पडला. दुपारी ११.४६ या शुभ मुहूर्तावर लग्नाची गाठ बांधली जाणार होती. मात्र लग्न मंडपात पुढील विधिची तयारी सुरू असताना रवी यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. मित्र आणि नातेवाईकांनी रवी यांना मिरजेच्या मिशन रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. लग्नाच्या बोहल्यावर चढायला काही क्षणांचा अवधी शिल्लक असताना काळाने घाला घातल्याने रवी यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.