आई वडील बीचवर गप्पा मारत होते, मुलगा समुद्रात गटांगळ्या खात होता

1

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

आई वडिलांच्या निष्काळजीपणामुळे एक अठरा महिन्याचे बाळ समुद्रात वाहून गेले. पण सुदैवाने समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या एका मच्छिमाराची नजर त्याच्यावर पडली. यामुळे मोठा अनर्थ टळल्याची घटना न्यूझीलँडमध्ये घडली आहे. ग्यूस हट असे या मच्छिमाराचे नाव आहे. ही घटना 26 ऑक्टोबर रोजी घडली.

काही दिवसांपू्र्वी न्यूझीलँडमधील एक जोडपं आपल्या अठरा महिन्याच्या बाळाला घेऊन मटाटा बीचवर फिरायला गेले होते. त्यांनी तिथे एक तंबूही उभारला. दुपारचे जेवण घेऊन ते तंबूत गप्पा मारत बसले होते. तर त्यांच बाळ किनाऱ्यावर वाळूमध्ये खेळत होतं. आई वडिलांचेही त्याच्याकडे लक्ष होते. दुपार होऊ लागली तसतसे भरतीचे पाणी किनाऱ्याच्या दिशेने झेपावू लागले. पण आई वडिल गप्पांमध्ये इतके दंग झाले होते की समुद्राची लाट आपल्या बाळाला आत घेऊन गेली हे देखील त्यांना कळाले नाही. त्यानंतर अचानक बाळ दिसेनासे झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. त्यांनी लगेच पोलिसांना व तटरक्षकांना बाळ हरवल्याचे सांगितले. त्यानंतर तटरक्षकांनी बाळाचा शोध घेण्यासाठी सुमद्रात उड्या मारल्या. तर काहीजण बोटीतून समुद्रात गेले. पण दूरपर्यंत बाळाचा ठावठिकाणा लागला नाही. मात्र एका छोट्या बोटीतून एक मच्छिमार हातात काहीतरी घेऊन किनाऱ्याकडे येत असल्याचे त्यांना दिसले. पोलिसांना बघताच तो मच्छिमारच त्यांच्या दिशेने आला. त्याने त्याच्या हातात शांत झोपलेल्या बाळाला पोलिसांच्या सुपुर्द केले व जे काही सांगितले ते ऐकून पोलिसही चक्रावले.

तो मच्छिमार मासेमारीसाठी बोटीतून खोल सुमद्रात जात होता. त्याचवेळी त्याला दूरवर लाटांवर एक बाहुलीसदृश्य वस्तू तरंगताना दिसली. ती प्लास्टिकची बाहुली असावी असे त्याला वाटले. पण जवळ जाऊन पाहताच त्याला धक्का बसला. ते एक बाळ होते. मच्छिमाराने बाळाला उचलले व बोटीत ठेवले. बाळ जिवंत होते. पण नाकातोंडात पाणी गेल्याने ते बेशुद्द झाले होते. यामुळे मच्छिमाराने त्याला तोंडाने कृत्रिम श्वासोश्वास दिला. त्यानंतर बाळ शुद्धीत आले. हे ऐकताच पोलिसांनी मच्छिमाराचे आभार मानले. त्यानंतर बाळाला आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले. बाळ सुखरुप असल्याचे बघून आई वडीलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.