उन्हापासून बचाव करण्यासाठी कारमध्ये बसलेल्या मुलाचा गुदमरून मृत्यू


सामना ऑनलाईन। अकोला

उन्हाचा त्रास होत असल्याने रस्त्याच्या बाजूला बंद अवस्थेत असलेल्या कारमध्ये जाऊन बसलेल्या मुलाचा (12) कारचे दरवाजे लॉक झाल्याने गुदमरून मृत्यू झाला. तन्नेश बल्लाळ असे त्याचे नाव आहे. अकोल्यातील आलेवाडी गावात मंगळवारी दुपारी ही घटना घडली.

तन्नेश आजीबरोबर रोज या परिसरात कचरा वेचण्यासाठी यायचा. मंगळवारीही तो आजीबरोबर येथे आला होता. पण उन्हाचा त्रास होत असल्याने व आजूबाजूला कुठेही झाडं नसल्याने आडरस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका कारमध्ये जाऊन तो बसला. पण कारचे दरवाजे लॉक झाले. यामुळे तन्नेश आतच अडकला. कारच्या खिडक्याही बंद असल्याने त्याने मदतीसाठी आजीला दिलेली हाक तिच्यापर्यंत पोहोचलीच नाही. कचरा वेचल्यानंतर आजी तन्नेशला शोधू लागली. पण तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे आजी व तनेशच्या पालकांनी जाऊन पोलिसात तन्नेश बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असता एका बंद पडलेल्या कारमध्ये तन्नेशचा मृतदेह त्यांना आढळला.