“त्या” बाळाला आयुष्यभर मोफत विमान प्रवास

सामना ऑनलाईन । मुंबई
जेट एअरवेजच्या विमानातून सौदी अरेबिया ते कोच्ची असा प्रवास करणाऱ्या महिलेने रविवारी विमानातच बाळाला जन्म दिला. यामुळे जेटने या बाळाला आयुष्यभरासाठी मोफत विमान प्रवास देण्याची घोषणा केली आहे. जेट विमानात बाळ जन्मास येण्याची ही पहिलीच घटना आहे.
 रविवारी पहाटे २.५५ वाजता जेट एअरवेजच्या 9W 569 या विमानाने सौदी अरेबियातील दम्मम विमानतळावरुन कोच्चीसाठी उडाण केले. या विमानात एका गर्भवती महिलेसह १६५ प्रवासी होते. ही महिला ३० आठवड्यांची गर्भवती होती. विमान प्रवासासाठी आवश्यक असलेली सर्व वैद्यकिय कागदपत्रेही तिच्याकडे होती. यामुळे तिला विमान प्रवास करण्याची परवानगी मिळाली होती. पण प्रवासादरम्यान तिला प्रसुतीकळा सुरु झाल्या. त्यावेळी विमान अरबी समुद्रावर ३५,००० फुट उंचीवर होते.  विमान लँड करणे शक्य नव्हते. यामुळे विमानातून प्रवास करणाऱ्या एका नर्सच्या मदतीने हवाईसुंदरींनी या महिलेची विमानातच प्रसूती केली. तिने एका गोंडस मुलाला विमानातच जन्म दिला.नंतर हे विमान मुंबईकडे वळवण्यात आले. त्यानंतर बाळ व बाळंतिणीला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे ठरलेल्या वेळेपेक्षा कोच्चीला पोहचायला विमानाला ९० मिनिटे उशीर झाला.