संजय भन्साळीला फक्त चपलेची भाषा समजते – भाजप

सामना ऑनलाईन । इंदुर

‘संजय लीला भन्साळी सारख्या लोकांना फक्त चपलेचीच भाषा समजते’, अशी टीका भाजपचे खासदार चिंतामणी मालविया यांनी केली आहे. मालविया यांनी पद्मावतीवर टीका करणारी पोस्ट फेसबुकवर शेअर केली असून त्यात त्यांनी पद्मावतीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

पद्मावती चित्रपटावरून सध्या देशभर वाद सुरू आहे. पद्मावतीच्या प्रदर्शनात कोणताही अडथळा येणार नसल्याची खात्री केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींनी संजय लीला भन्साळी यांना दिली असली तरी या चित्रपटाला भाजप नेत्यांकडूनच विरोध होत आहे. केंद्रीय मंत्री उमा भारती व गिरीराज सिंह यांनी पद्मावतीवर टीका केल्यानंतर आता मध्यप्रदेशमधील इंदुरचे खासदार चिंतामणी मालविया यांनी देखील या चित्रपटावर सडकून टीका केली आहे.

भन्साळी सारख्या लोकांना साधी भाषा समजत नाही त्यांना फक्त चपलेचीच भाषा समजते. थोडेसे पैसे कमविण्यासाठी त्यांनी इतिहासाशी छेडछाड केली आहे जे अत्यंत चुकीचे आहे. राणी पद्मावती या हिंदुस्थानातील प्रत्येक महिलेच्या आदर्श आहेत. त्यांनी देशाच्या व आपल्या समाजाच्या प्रतिष्ठेसाठी स्वत:ला आगीत झोकून दिले. हे वास्तव भन्साळींनी त्यांच्या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. ज्या लोकांच्या घरातील स्त्रिया दररोज आपले नवरे बदलतात त्यांना या इतिहासाचे महत्त्व काय कळणार? भन्साळीची ही विकृतीचा आम्ही सहन करणार आहे. त्यामुळे मी या चित्रपटाचा निषेध करतो आणि या चित्रपटावर सगळ्यांनी बहिष्कार घालावा असे आवाहन मी करतो, अशी पोस्ट मालविया यांनी फेसबुकवर शेअर केली आहे.