प्रेयसीच्या माफीसाठी प्रेमवीराचा प्रताप, पिंपरीतील 300 बॅनर्सनी पोलीस चक्रावले

219

सामना ऑनलाईन । पिंपरीचिंचवड

प्रेयसीला पटवण्यासाठी प्रेमवीर एक से बढकर एक शक्कल लढवतात. पिंपरीतील एका मजनूने प्रेयसीचे लक्ष वेधण्यासाठी चक्क रस्ते, गल्ली, नाकेही सोडले नाहीत. रस्त्यारस्त्यांवर एकच बॅनर ‘शिवडे आय एम सॉरी!’ एकदोन नव्हे तर तब्बल 300 बॅनर झळकल्याने पोलीसही चक्रावले. तपासानंतर प्रेयसी मुंबईहून पुण्याला येणार असल्याने हा प्रताप केल्याचे उघड झाले आणि  पोलिसांनीही डोक्याला हात लावला.

पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात ‘शिवडे आय एम सॉरी’ असे फलक लागले. पुण्याच्या दिशेने जाणार्‍या प्रत्येक रस्त्यावर हे फलक दिसू लागल्याने पोलीसही चक्रावले. त्यांनी तपास सुरू केला तेव्हा नीलेश खेडकर या पुण्यातील तरुणाने त्याचा मित्र आदित्य शिंदे याला असे फलक लावायला सांगितल्याचे सत्य समोर आले. मित्रही कलंदर. त्याने छोटे-मोठे असे तब्बल 300 फलक लावून रस्ते-नाके भरून टाकले. येणारे-जाणारेही हे फलक पाहून आश्चर्यचकित झाले. अनेकांनी तर सोशल मीडियावर या बॅनरचे फोटो व्हायरल केले. आता या प्रेमवीराला त्याच्या ‘शिवडे’कडून माफी मिळणार का अशी चर्चाही रंगली.

72 हजारांचा दंड बसू शकतो

या प्रेमवीराला प्रेयसीकडून माफी मिळो न मिळो पण बेकायदा बॅनरबाजी केल्यामुळे 72 हजारांचा दंडही बसू शकतो. शिवाय हे प्रकरण अद्याप पोलिसांनी सोडलेले नाही. वाकड पोलीस त्याचा अधिक तपास घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या तपासातून आणखी काय बाहेर पडते याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

आपली प्रतिक्रिया द्या