निफाडजवळ डिझेल पाइपलाइन फोडल्याने खळबळ

सामना प्रतिनिधी। नाशिक

अज्ञात चोरटय़ांनी निफाडजवळ खानगावथडी येथे भारत पेट्रोलियमची मुंबई-मनमाड डिझेल पाईपलाईन फोडल्याने लाखो  लिटर डिझेल वाया गेले, परिसरातील शेतांमध्येही ते पसरल्याने मोठी खळबळ उडाली होती. जमिनीत खोल नाले खोदून त्यानंतर हे पाईपलाईनमधील डिझेल टँकरमध्ये भरण्यात आले.

मनमाडजवळील पानेवाडी येथे पेट्रोल, डिझेल साठय़ाचा पेट्रोलियम कंपन्यांचा प्रकल्प आहे. मुंबईतील तुर्भे येथून पानेवाडीपर्यंत २५३ किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात आली आहे, त्याद्वारे पानेवाडीत हे इंधन येते, तेथून ते राज्याच्या विविध भागात टँकरद्वारे पाठविले जाते. निफाड तालुक्यातील तारुखेडलेजवळील खानगावथडी येथे ही पाइपलाइन फुटल्याचे व त्यातून मोठय़ा प्रमाणात डिझेल बाहेर येत असल्याचे गुरूवारी निदर्शनास आले. शेतांमध्ये डिझेल आल्याने शेतकऱयांची धावपळ उडाली. पोलिसांना कळविल्यानंतर भारत पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी आले. गोदावरी नदीत, शेतांमध्ये व विहिरींमध्ये डिझेल जाऊ नये यासाठी म्हणून सुमारे दहा फुटांचे खोल नाले तयार करून त्यातून टँकरमध्ये डिझेल भरण्यात आले. या पाइपलाइन दुरूस्तीला दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, परिसरातील विहिरींमध्ये डिझेल मिसळल्याने पाणी दूषित झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही पिकांचेही नुकसान झाल्याचे समजते. पाइपलाइन फोडणाऱया टोळीचा छडा लावण्याचे आव्हान पोलीस व पेट्रोलियम कंपनीपुढे आहे.