कश्मीर खोऱ्यातील ‘खऱ्या आझादी’चा अर्थ

<<ब्रिगेडियर हेमंत महाजन>>

[email protected]

आझादीच्या नावाखाली कश्मीरमधली हितसंबंधी मंडळी काय उकळू शकतात, याला मर्यादा असायला हव्यात. सवलतींकरिता वाटाघाटी करणे हा लोकशाही अधिकार आहे. कश्मिरींनाही तो आहेच. मात्र वाटाघाटींचा अर्थ धमकीच्या आधारे लाभ उकळणे असा होत नाही. पाकिस्तान प्रायोजित दहशतवादापासून आझादी, हुरियत कॉन्फरन्स आणि तत्सम फुटीरवादी मंडळींपासून आझादी, कुप्रशासनापासून आझादी हाच कश्मीरच्या खऱ्या स्वातंत्र्याचा अर्थ म्हणायला हवा.

जम्मू आणि कश्मीरमधील हिंदुस्थानी लष्कराच्या ‘ऑपरेशन ऑलआऊट’नंतर फुटीरतावादी कश्मिरी गट पूर्णपणे भांबावलेले आहेत. टिपून मारण्याची सैन्याची ही कवायत त्यांना पचणारी नाही. हे सगळेच फुटीरतावादी गट पाकिस्तानचे पाळीव आहेत. ‘कश्मिरीयत’पेक्षा आणि कश्मिरी जनतेच्या हितापेक्षा त्यांना स्वतःच्या तुंबडय़ा भरण्यातच अधिक रस आहे. २०१७ साली ‘आयबी’च्या अहवालानुसार पाकिस्तानने या फुटीरतावादी लोकांना ७०० कोटी रुपये दिले आहेत.

तरुणांना दररोज दगडफेक करण्यासाठी सहा ते सात हजार रुपये दिले जातात. तसेच पेट्रोलबॉम्ब वगैरे मिळाले तर थोडे अधिक पैसे मिळतात. याला ही मंडळी ‘आझादी’ म्हणतात. अशा भाडोत्री आंदोलकांकडून ‘आझादी’ मिळण्याची घटना जगात कुठेही घडलेली नाही. केवळ जेएनयुसारख्या डाव्यांच्या किल्ल्यातच अशा ‘आझादी’वर चर्चासत्रे ‘यशस्वी’ होऊ शकतात.

पर्यटन व्यवसाय हाच जम्मू-कश्मीरचा कणा आहे. इथली अर्थव्यवस्था आणि रोजगार पर्यटनाच्या माध्यमातूनच फुलते. सध्याचा काळ हा खरं तर पर्यटकांनी जम्मू-कश्मीर फुलण्याचा काळ, मात्र लष्करी कारवाया आणि दगडफेकीच्या घटनांचा विपरीत परिणाम स्थानिकांनाच भोगावा लागणार आहे. त्याची किंमत शिकारा चालविणारे, लहान-मोठे हॉटेलचालक, गाईड, चहा विकणारे, गाडय़ा चालविणारे यांनाच भोगावी लागणार आहे.

कश्मीरच्या शोपियॉंमध्ये एका शाळेच्या बसवर झालेल्या दगडफेकीत दोन मुले गंभीर जखमी झाली. मध्यंतरी अमरनाथ यात्रींच्या बसवर एक हल्ला झाला. बुरहान वानीच्या खात्म्यानंतर कश्मीर खोऱ्यात निदर्शनांची लाट उसळली आणि त्यात स्थानिक शाळा होरपळून निघाल्या. खोऱ्यातील जवळजवळ दोन डझन शाळा त्या आंदोलनाचे निमित्त करून दहशतवादी शक्तींनी जाळून टाकल्या. पण आम कश्मिरी नागरिकांना हे मुळीच आवडले नाही. कश्मिरी मुलांच्या शाळा जाळणे म्हणजे त्यांना शिक्षणापासून वंचित करणे आणि या मुलांना शिक्षणापासून वंचित करणे म्हणजे अर्थातच त्यांना मुख्य प्रवाहापासून तोडून गुन्हेगारी आणि दहशतवादाच्या वाममार्गावर खेचून नेणे हे न कळण्याइतकी कश्मिरी जनता दूधखुळी नाही. म्हणून त्याविरुद्ध ते प्रतिक्रिया व्यक्त करू लागले. चमक दाखवणाऱ्या मुलामुलींना राष्ट्रीय प्रवाहामध्ये अलगद सामावून घेतले जाते हे खोऱ्यातील देशद्रोही शक्तींना डोळ्यांत खुपत असते. म्हणूनच त्यांच्या शिक्षणात अडथळे आणण्याचा ते प्रयत्न करतात. त्यांना मुख्य प्रवाहापासून तोडायचे, त्यांच्या शिक्षणाच्या संधींपासून वंचित करायचे, रोजगाराच्या संधींपासून वंचित ठेवायचे म्हणजे ते दहशतवादाच्या मार्गाकडे निरुपाय होऊन वळतील अशा अपेक्षेने हे सगळे कारस्थान केले जाते.

केंद्र सरकारने दहशतवाद्यांविरुद्ध स्वीकारलेले कठोर धोरण आणि त्याची परिणती म्हणून सातत्याने चाललेला देशद्रोह्यांचा खात्मा यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या शक्ती आता शाळकरी मुले आणि पर्यटक यांनाही लक्ष्य बनवू लागल्याचे दिसते आहे. मात्र अशा प्रकारचे हल्ले हा कश्मिरींसाठी आत्मघातच ठरणार आहे. पर्यटन हे कश्मीरच्या अर्थव्यवस्थेचे एक प्रमुख अंग आहे. जवळजवळ पंचवीस लाख कश्मिरींचे पोट जरी पर्यटनावर चालते. अनेक प्रकारचे लोक – हॉटेलवाले, ट्रव्हल एजंट, भाडोत्री वाहनधारक, हाऊसबोटवाले, शिकारावाले, घोडेवाले, गाईड, हस्तकला व्यावसायिक, पर्यटनस्थळांवरील दुकानदार केवळ पर्यटनावर अवलंबून असतात. हिंसाचारामुळे हॉटेल, हाऊसबोटींतील पर्यटकांच्या वास्तव्याचे प्रमाण अर्ध्याहून अधिक उतरले आहे. दगडफेक करणारे हे आमचे ‘बच्चे’ आहेत असे मायेचे कढ मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींना येत होते. आज निरपराध पर्यटकांना हे ‘बच्चे’ लक्ष्य करू लागले आहेत, त्यावर मात्र आपली मान शरमेने झुकल्याचे नक्राश्रू त्या आणि ओमर अब्दुल्ला ढाळत आहेत.

त्याचप्रमाणे रमजान महिन्याच्या काळात हिंदुस्थानी लष्कराने कश्मीरमध्ये शस्त्रबंदी घोषित करावी, हा मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला आहे. जेव्हा सैनिक तळांवर किंवा सैनिकांवर हल्ले होतात तेव्हा सैन्याला दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची मोहीम हाती घ्यावी लागते. ती मुहूर्त पाहून किंवा कोणाच्या भावनांचा विचार करून ठरविता येत नाही. जशी परिस्थिती असेल तशी आणि तेव्हा ती हाती घ्यावी लागते. त्यामुळे अमूक कालावधीत ती टाळा, असे आवाहनच अयोग्य आहे.

पाकिस्तानमध्ये विलीन होणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. काही मोजके कट्टरमतवादी वगळता, कुणीच शुद्ध मनाने पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा विचारही करणार नाही. वर्तमानकाळी निर्वासित झालेले कश्मीर खोऱ्यातील पंडित, डोग्रा आणि जम्मूतील मुस्लिम, लडाखमधील बौद्ध, राज्याच्या निरनिराळ्या भागांतील शिया आणि गुज्जर हे या तथाकथित ‘आझादी’च्या चळवळीत कधीच सहभागी झाले नव्हते. तेव्हा इस्लामिक आझादी तर दूरची गोष्ट आहे. किंबहुना या लोकांना हिंदुस्थानसोबत अधिक दृढ संबंध हवे आहेत. त्यामुळे खऱ्या आझादीचा अर्थ पाकिस्तानपासून कायमचे स्वातंत्र्य असा होतो. हिंदुस्थानातील इतर नागरिक जे स्वातंत्र्य उपभोगत आहेत, ते प्राप्त करणे असा होतो.

आझादीच्या नावाखाली कश्मीरमधली हितसंबंधी मंडळी काय उकळू शकतात, याला मर्यादा असायला हव्यात. सवलतींकरिता वाटाघाटी करणे हा प्रत्येक हिंदुस्थानी उपभोगत असलेला लोकशाही अधिकार आहे. कश्मिरींनाही तो अधिकार आहेच. मात्र वाटाघाटींचा अर्थ धमकीच्या आधारे लाभ उकळणे असा होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत हिंदुस्थानातील इतर लोक जे उपभोगत आहेत त्या प्रकारचे स्वातंत्र्यच त्यांना मिळेल हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. पाकिस्तान प्रायोजित दहशतवादापासून आझादी, हुरियत कॉन्फरन्स आणि तत्सम फुटीरवादी मंडळींपासून आझादी, कुप्रशासनापासून आझादी हाच कश्मीरच्या खऱ्या स्वातंत्र्याचा अर्थ म्हणायला हवा.

आपली प्रतिक्रिया द्या