सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची पोखरणमध्ये यशस्वी चाचणी

सामना ऑनलाईन । पोखरण

हिंदुस्थानने गुरुवारी सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. राजस्थानातील पोखरण येथील तळावर गुरुवारी ही चाचणी पार पडली. रडारच्या टप्प्यात न येता कमी उंचीवर अत्यंत वेगाने उड्डाण घेणे हे ब्रह्मोसचं वैशिष्ट्य आहे. या क्षेपणास्त्राचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा २.९ पटीने जास्त आहे. ब्रह्मोस २९० किमी पर्यंत मारा करु शकतो, तर ३०० किग्रॅ वजनाची स्फोटकं वाहून नेण्याची ब्रह्मोसची क्षमता आहे.

हिंदुस्थान आणि रशिया यांनी एकत्ररित्या तयार केलेल्या ब्रह्मोसची मारक क्षमता ४०० किमीपर्यंत वाढवली जाऊ शकतो. ५०० ते १४ हजार मीटर उंचीवरून या क्षेपणास्त्राने हल्ला केला जाऊ शकतो. जमिनीखालील बंकर्स, कन्ट्रोल सेंटर्स आणि समुद्रावरून उडणाऱ्या विमानांनाही क्षणात उध्वस्त करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.