ज्ञानेश्वरीने अंधांचे जीवनही उजळून निघेल, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘ब्रेल ज्ञानेश्वरी’चे प्रकाशन

सामना ऑनलाईन । मुंबई

सर्वसामान्यांना जे उघड्या डोळ्यांनी दिसत नाही ते पाहण्याची दिव्यदृष्टी अंधांकडे असते. ज्ञानेश्वरी वाचल्याने सर्वसामान्यांच्या आयुष्यात प्रकाश पडतोच; पण ही ज्ञानेश्वरी आता ब्रेल लिपीतूनही उपलब्ध झाल्याने अंधांचे जीवनही उजळून निघेल, अशा शुभेच्छा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ‘ब्रेल ज्ञानेश्वरी’च्या प्रकाशनावेळी दिल्या.

‘दी ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन’ संस्थेच्या वतीने अंधांसाठी ब्रेल लिपीतील ‘ज्ञानेश्वरी’ प्रसिद्ध करण्यात आली. या ग्रंथाचे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे झाले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर उपस्थित होते. अंध व्यक्तींसाठी  ‘दी ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन’कडून राबविण्यात येणार्‍या उपक्रमांबाबत उद्धव ठाकरे यांनी संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांचे कौतुक केले. शिवसेना अंध व्यक्तींच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. त्यांच्यासाठी राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांत आम्ही सहकार्य करू, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.

यावेळी खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, माजी महापौर महादेव देवळे, दगडू सकपाळ, उपनेते रवींद्र मिर्लेकर, ब्लाइंड ऑर्गनायझेशनमधील महेंद्र मोरे, कल्पना पांडे, सेंट्रल रोटरी क्लबच्या नेहा निंबाळकर आदी उपस्थित होते.

 

अंध विद्यार्थ्यांनी वाचला ज्ञानेश्वरीचा अध्याय

ब्रेल लिपीतील ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथामध्ये १२, १५, १६ आणि १८ वा हे चार अध्याय देण्यात आले आहेत. १८ व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीचे संपूर्ण सार आले असून प्रत्येक अंध विद्यार्थ्यापर्यंत ‘ज्ञानेश्वरी’ पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी सांगितले. यावेळी तिथे जमलेल्या अंध विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरी देण्यात आली. ब्रेल लिपीतील ज्ञानेश्वरीवरून बोटे फिरवताना या विद्यार्थ्यांच्या मुखातून एक एक ओवी सहज बाहेर पडली.

 

ज्ञानेश्वरी बेल लिपीत आणणे हे मोठे काम

आजच्या युगात डोळस व्यक्तींनाही अध्यात्माची नव्याने ओळख करून देण्याची आवश्यकता आहे. डोळस व्यक्ती समाजात अंधपणे वावरत आहेत; मात्र अंध व्यक्ती आज खर्‍या अर्थाने समाजात दिव्यदृष्टीने वावरत आहेत. त्यांच्याकडून समाजाने खूप काही शिकण्यासारखे आहे. या अंध व्यक्तींच्या आयुष्यात या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अध्यात्म पोहोचेल, अशी आशा राजीव खांडेकर यांनी व्यक्त केली. तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भगवद्गीतेचे ज्ञान ‘ज्ञानेश्वरी’च्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले. हेच ज्ञान आता अंधांपर्यंत पोहोचविण्याचे महान कार्य ‘दी ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशन’च्या माध्यमातून केले जात असल्याचे गौरवोद्गार काढले.