न्याय मागण्यांसाठी बीड जिल्ह्यातून हजारो ब्राह्मण बांधव होणार मुंबईकडे रवाना

5

सामना प्रतिनिधी । बीड

ब्राह्मण समाजाच्या विविध न्याय मागण्यासाठी मंगळवार २२ जानेवारी रोजी राज्यातून समाजबांधव मुबंईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलनास उपस्थित राहणार आहेत. बीड जिल्ह्यातून हजारो बांधव सोमवारी हजारोंच्या संख्येने सहभागी होण्यासाठी रवाना होणार असून यासाठी शनिवारी घेण्यात आलेल्या व्यापक बैठकीत एक ब्राह्मण नेक ब्राह्मण म्हणत समाजाने वज्रमुठ बांधल्याचे दिसून येत आहे.

शनिवारी बीड येथील औटी मंगल कार्यालयात ‘ना नेता, ना संघटना, ना पदाधिकारी’  ‘एक ब्राह्मण नेक ब्राह्मण’ हे ब्रीद घेऊन 22 जानेवारीच्या मुंबई येथील ब्राह्मण समाज धरणे आंदोलना निमित्त व्यापक बैठक घेण्यात आली. यावेळी आचार्य अमृताश्रय स्वामी महाराज जोशी,राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प.भरतबुवा रामदासी, वे.शा.स.धुंडीराजशास्त्री  पांटागणकर,जेष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.कालिदासराव थिगळे, दिलीपराव खिस्ती, महेशराव वाघमारे, ह.भ.प.एकनाथ पुजारी, वे.शा.स.दुर्गादासबुवा जोशी,अमोलशास्त्री जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना महंत अमृत महाराज जोशी म्हणाले की “हिंदू धर्माचे प्रतीक असलेला ब्राह्मण समाज ग्रामीण भागात प्रचंड तणावाखाली जगतो आहे. आपण ब्राह्मण आहोत ही संकल्पना मांडण्यासाठी खेड्यापाड्यात समूह नष्ट झाला आहे. भरकटलेल्या या समाजाच्या उत्कर्षासाठी आता ठोस निर्णय घेण्याची गरज असून वणी तो चेतवा रे..!  या प्रमाणे एखादा प्रलय येऊन जसा धडकतो त्याच प्रलय काळाप्रमाणे आता  सर्वानी शाखा, पोट शाखा बाजूला सारून आणि मतभेद विसरून मुंबई गाठा, तरच आपली शासन दरबारी दखल घेतली जाईल. तर  मतभेदाच्या या भिंती बाजूला सारून आता खरी शक्ती दाखविण्याची गरज असून एकत्र आल्याशिवाय ती दिसणार नाही.” असे भरतबुवा रामदासी यांनी यावेळी सांगितले.

अ‍ॅड.के.पी.थिगळे म्हणाले की, “ब्राह्मण समाजासाठी बीडचे तरूण समाज कार्यासाठी म्हणून पुढे येत आहेत. त्यांना बळ देण्याची गरज असून त्यांच्या संघटना कुठल्याही असो त्यांना समाजाने पाठिंबा द्यावा तसेच तरूणांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सोमवारी सायंकाळी ४ वाजता सिद्धिविनायक संकुल, स्वामी समर्थ मंदिर येथून समाजबांधव मुबंईला रवाना होणार आहेत.