माय-लेकाच्या हिमतीपुढे चोर हरला!

सामना ऑनलाईन । डोंबिवली

घरात घुसलेल्या चोराला मोठ्या हिमतीनं एका शाळकरी मुलानं आणि त्याच्या आईनं पकडलं आहे. डोंबिवली पूर्वेकडील विनीत सदन इमारतीत ही घटना घडली आहे. रेहान फुरखान खान असं पकडलेल्या चोराचं नाव आहे. घटनेनंतर या शूर माय-लेकाचं सर्वांकडून कौतुक केलं जात आहे.

प्रणव घाडीगावकर हा आठवीत शिकणारा मुलगा बुधवारी आपल्या घरात एकटाच सहामाही परीक्षेचा अभ्यास करत बसला होता. दुपारी ३.३०च्या सुमारास आईसक्रीम खाण्यासाठी तो घरातून बाहेर गेला. मात्र आईसक्रीम खाऊन परतल्यानंतर त्याला घराचं कुलूप तोडलेलं दिसलं. प्रणव घरात गेल्यानंतर चोर त्यांच्या घरातील कपाटातून वस्तू बाहेर काढत असल्याचं दिसलं. प्रणव मोठ्या हिमतीनं चोराला सामोरं गेला, मात्र चोराने त्याचा शर्ट पकडत धमकावलं आणि गप्प बसण्यास सांगितलं. दरम्यान, सुदैवाने प्रणवची आई अंजली घाडीगावकर कामावरून त्याचवेळी घरी परतल्या. प्रणव अभ्यास करतोय की नाही हे पाहण्यासाठी त्या लवकर घरी आल्या होत्या.

घरी आल्यानंतर त्यांनी पाहीलं की, चोराने प्रणवला धरून ठेवलं होतं. मात्र कसलीही पर्वा न करता अंजली यांनी आरडा-ओरडा करण्यास सुरूवात केली. चोराला अंजली यांचा आरडा-ओरडा अनपेक्षित होता. त्यामुळे तो घाबरून पळण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र अंजली यांनी त्याला अडवलं आणि पकडून ठेवलं. प्रणवनेही त्याचं शर्ट धरून त्याला पकडून ठेवलं. त्याचवेळी शेजारचे लोकही अंजली यांचा आवाज ऐकून त्याठिकाणी जमले होते. त्यानंतर पोलिसांना बोलावून चोराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.