जीव धोक्यात घालून वाचवले अनेकांचे प्राण

सामना प्रतिनिधी । मुंबई

कमला मिल दुर्घटनेत स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवणारे पोलीस कॉन्स्टेबल सुदर्शन शिंदे यांचा गौरव आज महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला. शिंदे यांच्या वरळी येथील घरी जाऊन त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.

कमला मिल दुर्घटनेवेळी सुदर्शन यांनी जिवाची पर्वा न करता आगीत अडकलेल्या अनेकांची सुटका केली. त्यांची ही कामगिरी म्हणजे माणुसकीचे उत्तम उदाहरण असल्याचे गौरवोद्गार महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी काढले. शिंदे यांचे शौर्य खरोखरच गौरवास्पद असून राज्य सरकारने त्याची दखल घ्यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवणार असल्याचेही महापौर म्हणाले. यावेळी सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर, नगरसेवक आशीष चेंबूरकर उपस्थित होते. या दुर्घटनेप्रकरणी मिल मालक गोवानी याच्यासह जबाबदार असणाऱयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही महापौरांनी केली. दरम्यान, पोलीस आयुक्त दत्ता पडमलगीकर यांनीसुद्धा सुदर्शन शिंदे यांचा आज सत्कार केला.