११ दिवसानंतर ‘ती’ जमिनीत गाडलेल्या शवपेटीतून बाहेर आली

सामना ऑनलाईन । रियाचाओ, ब्राझील

ब्राझीलच्या रियाचाओ डास नेवेसमध्ये एक विचित्र मात्र तितकीचं दिलासादायक घटना समोर आली आहे. या गावात असलेल्या एका शवपेटीतून अचानक आवाज येऊ लागल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. या आवाजाचा शोध घेण्यासाठी गावकऱ्यांनी जमिनीत पुरलेली ही शवपेटी बाहेर काढली तेंव्हा सगळ्यांनाच धक्का बसला, कारण या शवपेटीतून एका महिलेला चक्क जिवंत बाहेर काढण्यात आले. तब्बल ११ दिवस ही महिला जमिनीतून बाहेर निघण्यासाठी तडफडत होती. रोसनगेला लमीडा डोस सैंटोस असे या ३७ वर्षीय महिलेचे नाव आहे.

रोसनगेला यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. जवळपास आठवडाभरानंतर २८ जानेवारी रोजी डॉक्टरांनी रोसनगेला यांना मृत घोषित केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना जमिनीत दफन करण्यात आलं होतं. काही दिवसांनी रोसनगेला यांना ज्या ठिकाणी दफन केलं होतं तिथे नतालिया सिल्वा या महिलेला जमिनीतून किंचाळण्याचा आवाज येत होता. नतालिया यांनी याबाबत परिसरातील लोकांना कळवलं. त्यानंतर स्थानिक नागरिकांना रोसनगेला यांच्या नातेवाईकांना याबद्दल माहिती दिली.

रोसनगेला यांच्या नातेवाईकांनी जमिनीमध्ये पुरण्यात आलेली शवपेटी खोदून बाहेर काढली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या शवपेटीमधून जिवंत रोसनगेलाच बाहेर आल्या. रोसनगेला यांनी बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न केला होता. त्यांची नखे अक्षरश: उखडली होती, त्यांना ठेवण्यात आलेल्या पेटीचे झाकण निघाले होते, शरीरावरही अनेक जखमा झाल्या होत्या. रोसनगेला यांच्या मृत्यूची चुकीची माहिती दिलेल्या डॉक्टरविरोधात कोणतीही तक्रार करणार नसल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.