लोकलमधला प्रेमाचा गुलकंद!

jyotsna-gadgil>>ज्योत्स्ना गाडगीळ

ट्रेनमध्ये नेहमी खिदळणारा कोपरा आज शांत होता. त्या १०-१२ जणींना एवढे शांत बसलेले कधीच पाहिले नव्हते. तेवढ्यात एका काकूंनी त्यांच्यातल्या एकीच्या खांद्यावर हात ठेवत ‘होईल सगळं ठीक!’ असे म्हणत समजूत काढली. ग्रुपमधल्या बाकीच्या सगळ्यांनी डोळ्यांनी सहानुभूती दर्शवत एकसुरात हुंकार भरला. तसा तिचा बांध फुटला आणि ती आणखी हमसून हमसून रडू लागली. काय असावे बरे तिच्या दुःखाचे कारण, माझी उत्सुकता चाळवली. मुलगी उपवर होती, त्यामुळे लग्नासंबंधी काहीतरी घडले असावे, अशी मला शंका आली.

एव्हाना तिच्या दुःखाची अवकळा पूर्ण लेडीज कम्पार्टमेंटवर पसरली होती. दुःखाचा आवेग ओसरल्यावर ती आवंढा गिळत बोलू लागली,”आई बाबांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना माझी आवड पटलीच नाही, त्यांनी मला लग्नाला नकार दिला. वाटलेलं, समजून घेतील मला, पण त्यांनी….” वाक्य मध्येच तोडून ती पुन्हा हतबल झाल्यासारखी रडू लागली. मनगटाने अश्रूंना वाट करून देत पुटपुटली, “कशातच मन लागत नाहीये, जगावंसच वाटत नाहीये!” असे म्हणताच तिची जिवलग मैत्रीण तिला घट्ट बिलगली, “वेडीयेस का? शांत हो, होईल सगळं ठीक”… पुनः निःशब्द शांतता…गाडीच्या कड्या उगीचच वाजत होत्या. तो सिरिअस माहोल बघून फेरीवालाही तिथे फिरकला नाही!

पुढच्या स्टेशनला उतरण्यासाठी दाराजवळ उभ्या असलेल्या एक आजी हा संवाद ऐकून, उतरण्याचा बेत रद्द करत समुपदेशन करण्यासाठी मुलीजवळ आल्या. ”मी काही बोलू का? नाही म्हणजे तुझ्यासाठी मी अनोळखी असले तरी, हा विषय माझ्यासाठी अनोळखी नाही, किंबहुना आपल्यापैकी कोणासाठीच तो अनोळखी नाही!” असे म्हणत आजींनी सूत्रे हाती घेतली. ती मुलगीच काय, तर बाकीच्या सगळ्या जणीही आजींना ऐकू लागल्या.

“लग्न हा आयुष्याला कलाटणी देणारा विषय असला, तरी लग्न म्हणजे सबंध आयुष्य नाही. एक गोष्ट मनासारखी झाली नाही, म्हणून हिरमुसून जाण्याचं अजिबात कारण नाही. तू प्रेम केलंस, तुझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती तुझ्या आयुष्यात आली, तुम्ही दोघांनी मिळून जे क्षण जगलेत ते मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेव. पुढे कधी एकाकी वाटलं, हळवी झालीस, आयुष्य संपवावसं वाटलं, की हीच सोनेरी पानं उलगडून पहा. जगण्याची नवी उमेद मिळेल. तू प्रामाणिक प्रयत्न केलास आणि वस्तुस्थितीही स्विकारलीस, आता अशी ढेपाळू नकोस! प्रेमाने माणूस कमकुवत होत नाही, तर कणखर होतो. तुझ्या प्रेमाला तुझी ताकद बनव आणि आयुष्याकडे सकारात्मकतेने बघ.

”तुला काय वाटतं, प्रेमभंगाचं दुःखं पचवलेली तू एकटीच इथे आहेस? इथे असलेल्या प्रत्येकीच्या मनात एका कृष्णाने घर केलं आहे. ज्यांना संधी मिळाली, त्या रुक्मिणी झाल्या, ज्यांना नाही मिळाली, त्या राधा झाल्या!”आजींच्या ह्या वाक्याने ‘ती’च्यासट प्रत्येकीच्या काळजाचा ठाव घेतला. सगळ्यांनी अधिकच कान टवकारले. आजी म्हणाल्या, ”राधा कृष्णाचं प्रेम हे शाश्वत प्रेमाचं प्रतीक आहे. शरीराने भिन्न असूनही मनाने एकरूप झालेले राधा-कृष्णाचे नाते आपल्याला संयम ठेवायला शिकवते. तोच नेमका तुमच्या पिढीत बघायला मिळत नाही. ‘तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नही, तुम किसी और को चाहोगी बडी मुश्किल होगी’ असं आमच्या काळात मुकेशनेही म्हणून ठेवलं होतं. तरीही तेव्हा अॅसिड हल्ले, हाणामारी झाल्याचे ऐकीवात नाही. मात्र आता, परिस्थिती गंभीर होत चालली आहे. नकार पचवता येत नाही, सूड उगवला जातो, सोशल मीडियावर जाहीर बदनाम केलं जातं, असं बरंच काही आपण वाचतो. त्यामुळे प्रेमभंगाचा त्रास एकाला नव्हे तर पूर्ण कुटुंबाला होतो. म्हणून प्रेमात सामंजस्य ठेवायला शिका. नकार सहन करण्याची तयारी ठेवा आणि प्रेमभंग झाला तरी जमल्यास मैत्री कायम ठेवा. त्यामुळे नात्यात वितुष्ट राहत नाही, मनांची घुसमट होत नाही, ‘ती सध्या काय करते’ ह्या विचारात आयुष्याचा वेळ वाया जात नाही. प्रियकरातून मित्राच्या भूमिकेत यायला वेळ लागेल थोडा, पण दोघांनी ठरवलंत, तर एक नातं तुमच्या किंवा घरच्यांच्या अहंकाराच्या थडग्यात दफन न होता, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जिवंत राहील. आचार्य अत्रेंची ‘प्रेमाचा गुलकंद’ कविता आठवते ना? बस्स तर मग, हाच गुलकंद पुरवून खायला शिका, म्हणजे आयुष्याचा गोडवा कधीच कमी होणार नाही, उलट वाढतच जाईल. कळलं का?’’

आजींच्या समुपदेशनाने सगळ्या जणी संमोहित झाल्या होत्या. तेवढ्यात आजींचा फोन खणाणला, ‘हो हो उतरते’ असे म्हणत त्यांनी सर्वांचा निरोप घेतला आणि त्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाल्या, ‘ होईल सगळं ठीक, प्रेमाचा गुलकंद तेवढा घेत राहा!’