अल्पवयीन मातेने जिवंत बाळाला जमीनीत पुरले, कुत्र्याने दिले जीवदान

16

सामना ऑनलाईन । बँकॉक

थायलंडमध्ये ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीला साजेशी घटना घडली आहे. एका 15 वर्षीय अल्पवयीन मातेने घरच्यांना घाबरून तिच्या जिवंत बाळाला जमीनीत पुरले होते. मात्र एका कुत्र्याने जमीन उकरून या बाळाला जीवदान दिले. पिंग पोंग असे या कुत्र्याचे नाव असून थायलंडमधल्या कोरट येथील 15 मे रोजी ही घटना घडली आहे.

पिंग पोंग नेहमीप्रमाण त्याचे मालक उसा निसिका यांच्यासोबत शेतात गेला होता. त्या दिवशी पिंग पोंग अचानक जमीन हुंगुन पंज्यांच्या सहाय्याने जमीन उकरायला लागला. कुत्रा जमीन का उकरतोय या कुतुहलाने मालकाने बघितले असता, त्याला बाळाचे पाय दिसले. त्याने त्वरीत माती बाजूला करून बाळाला बाहेर काढले. त्यावेळी नवजात बाळ जिवंत असल्याचे आढळले. मालकाने बाळाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. बाळाला वेळेवर उपचार मिळाल्याने त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तर पिंग पोंग हा अतिशय गुणी कुत्रा असून, लहानपणी त्याला एका कारने धडक दिल्याने तो मागच्या पायाने अधू आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी मुलाच्या 15 वर्षीय आईला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या