‘हिमालय’ पादचारी पूल कोसळला,6 ठार

पूलाचा काही भाग रस्त्यावरच कोसळला होता.

सामना ऑनलाईन, मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाला लागून असलेल्या ‘हिमालय’ पादचारी पुलाचा भाग कोसळल्याने सहा जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली. कामावरून घरी जाणाऱया मुंबईकरांची या पुलावर गर्दी असतानाच ही घटना घडल्याने यावेळी प्रचंड पळापळ झाली. या दुर्घटनेत 31 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे डी.एन. मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली.

सीएसएमटी स्थानकाबाहेरील ब्रिज कोसळला, पाहा हे भयंकर फोटो

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची, तर जखमींना 50 हजारांची मदत करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली

रेल्वेने एनओसी दिली नसल्याने दुरुस्ती रखडली

या पुलाच्या दुरुस्तीसाठी रेल्वेकडे पालिकेकडून ‘एनओसी’ मागण्यात आली होती. मात्र ही एनओसी अद्याप दिली नसल्याने या पुलाच्या दुरुस्तीचे काम रखडल्याची माहिती महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली. दुर्घटनेनंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूसही केली.

घटनास्थळाहून ढिगारा हटवण्याचे काम सुरू करण्यात आले.
घटनास्थळाहून ढिगारा हटवण्याचे काम सुरू करण्यात आले.

सखोल चौकशीचे आदेश

मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी तातडीने सेंट जॉर्जेस आणि जीटी रुग्णालयात धाव घेऊन दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. त्यांनी तातडीने राज्याच्या मुख्य सचिवांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले. ही चौकशी कुणामार्फत करायची ते तुम्ही ठरवा पण त्याचा अहवाल तातडीने माझ्याकडे यायलाच हवा, असे आदेशही त्यांनी दिले. कुणाचीही गय केली जाणार नाही, दोषींवर निश्चितच कारवाई करू, असे देसाई यांनी पत्रकारांना सांगितले. मुंबईतील पुलांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देऊ नका असे आदेश आपण यापूर्वीच दिले असून सर्व पुलांची पुन्हा नव्याने पाहणी आणि ऑडिट करण्यात येईल, असेही देसाई म्हणाले.

या दुर्घटनेत काही गाड्यांचेही नुकसान झाले.
या दुर्घटनेत काही गाड्यांचेही नुकसान झाले.

मृतांची नावे

  • अपूर्वा प्रभू (35)
  • रंजना तांबे (35)
  • झाहीद सिराज खान (32)
  • भक्ती शिंदे (40)
  • तेपेंद्र सिंग (35)
  • मोहन कायगुडे (58)

कसाबच्या नावाने ओळखला जायचा पूल!

या पुलाला ‘हिमालय’ पूल असे म्हटले जाते. म्हणजे महापालिकेच्या दफ्तरी तरी तशी नोंद आहे. मात्र जेव्हा मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा कसाब याच पुलावरून कामा हॉस्पिटलच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करत गेला होता. तेव्हापासून हा पूल ‘कसाब पूल’ म्हणून ओळखला जाऊ लागला.

सुदैवाने मोठा अनर्थ टळला

ब्रीजचा भाग कोसळण्याच्या वेळी सिग्नल बंद असल्याने पुलापासून गाडय़ा काही अंतरावर उभ्या होत्या. तरीदेखील दोन गाडय़ांवर पुलाचा मलबा कोसळला. यामध्ये ज्या टॅक्सीवर मलबा कोसळला त्यामध्ये कुणी प्रवासी नसल्याने जीवितहानी टळली. टॅक्सीचा ड्रायव्हर सुदैवाने वाचला. जर यावेळी सिग्नल सुरू असता तर गाडय़ांची मोठी वर्दळ असल्यामुळे मोठी जीवितहानी होण्याचा धोका होता.

गुन्हा सदोष मनुष्यवधाचा, स्ट्रक्चरल ऑडिटवरच प्रश्नचिन्ह

दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. 1980 मध्ये बांधलेल्या या पुलाची गेल्या वर्षीच दुरुस्ती करण्यात आली होती असे त्यांनी सांगितले. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये किरकोळ दुरुस्ती सुचवली असताना इतकी मोठी दुर्घटना घडल्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिटवरच मुख्यमंत्र्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे या दुर्घटनेची उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून चौकशी करून जबाबदार असणाऱयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.