लेख : पुन्हा एकदा खलिस्तानवाद

>>ब्रिगेडियर हेमंत महाजन<<

[email protected]

खलिस्तानसाठी मेळावा लंडन डिक्लेरेशननावाने ओळखला जातो आणि अमेरिकास्थित सिख फॉर जस्टिसया संस्थेने तो आयोजित केला होता. या बैठकीचा मुख्य उद्देश होता की, 2020 मध्ये जगभर सार्वमत घेतले जावे आणि हिंदुस्थानातील पंजाबला स्वातंत्र्य मिळावे. हिंदुस्थान व जगातील वीस शहरांत सार्वमत घ्यावे आणि 50 लाख मतांचा त्याला पाठिंबा मिळवावा अशी धडपड सुरू आहे. नंतर त्याचा निकाल युनोत पाठवण्यात येणार आहे.

पाकिस्तानी वंशाचे लंडनचे विद्यमान महापौर सादिक खान यांनी प्रो-खलिस्तान संमेलन (रॅली) ट्रफाल्गर उपनगरात 12 ऑगस्ट रोजी भरवण्यास परवानगी दिली. मात्र त्याच दिवशी एक ते चार वाजायच्या दरम्यान हिंदुस्थानच्या बाजूने असलेल्या संमेलनाला मात्र परवानगी नाकारली. कारण सांगण्यात आले की, त्यांनी ही परवानगी वेळेवर मागितली नव्हती. खलिस्तानसाठी मेळावा ‘लंडन डिक्लेरेशन’ नावाने ओळखला जातो आणि अमेरिकास्थित ‘सिख फॉर जस्टिस’ या संस्थेने तो आयोजित केला होता. या बैठकीचा मुख्य उद्देश होता की, 2020 मध्ये जगभर सार्वमत घेतले जावे आणि हिंदुस्थानातील पंजाबला स्वातंत्र्य मिळावे. या सार्वमतामध्ये 3 कोटी शीख सहभाग घेतील आणि स्वतंत्र खलिस्तानसाठी मतदान करतील असे सिख फॉर जस्टिसने जाहीर केले आहे. हिंदुस्थानातील शिखांनाही यामध्ये सहभाग घेता येईल असे या संघटनेने म्हटले आहे. हिंदुस्थान व जगातील वीस शहरांत सार्वमत घ्यावे आणि 50 लाख मतांचा त्याला पाठिंबा मिळवावा अशी धडपड सुरू आहे. नंतर त्याचा निकाल युनोत पाठवण्यात येणार आहे.

लंडनस्थित हिंदुस्थानींनी प्रो-खलिस्तान संमेलनाविरुद्ध ‘आम्ही हिंदुस्थानी’ म्हणून एक संस्था सहा महिन्यांपूर्वी उभारली. त्यांनी ठरवले की, 15 ऑगस्टच्या निमित्ताने ते हिंदुस्थानचा स्वातंत्र्यदिन लंडनमध्ये साजरा करतील. मात्र या बैठकीला लंडनचे महापौर पाकिस्तानी मूळचे सादिक खान यांनी परवानगी दिली नाही. त्यांच्या या कारवाईला हिंदुस्थानविरोधी मानले जाते.

1980-90च्या दशकातील खलिस्तानची चळवळ हिंदुस्थानातून नष्ट करण्यात आली असली तरी इंग्लंड, कॅनडासारख्या देशांमध्ये काही मोजक्या लोकांनी खलिस्तान प्रश्नाचा निखारा धगधगत ठेवला आहे. त्यामुळे हिंदुस्थान आणि कॅनडा यांच्या परस्पर संबंधांवर अनेकदा परिणाम झाला आहे.

अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यांनंतर जगातील सर्वच राष्ट्रांनी दहशतवादाच्या विरोधात कठोर पावले उलचण्यास प्रारंभ केला. त्यानंतर या खलिस्तानवाद्यांनी आपला पवित्रा बदलून स्वतंत्र राज्याची उघड मागणी करण्याचे बाजूला ठेवले. त्याऐवजी ते शिखांवर होणारा अन्याय आणि अल्पसंख्याकांच्या अधिकारांबद्दल बोलू लागले. त्यात पंजाबातील बेरोजगारी आणि ड्रग माफियांचा उदय या समस्यांनी गेली दहा वर्षे थैमान घातले आहे. याचा फायदा घेऊन पंजाबमध्ये दहशतवाद पुन्हा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करीत आहे

पाश्चात्य देशांतील राजकारण्यांना खलिस्तान काय आहे हे माहीत आहे. पंजाब हे कश्मीरच्या शेजारचे राज्य आहे, आणि स्वतंत्र कश्मीरला सक्रिय पाठिंबा देणारा खलीद आवान हा पाकिस्तानी वंशाचा कॅनडियन नागरिक ‘खलिस्तान कमांडो फोर्स’ला शस्त्रपुरवठा केल्याचा आरोप सिद्ध होऊन अमेरिकेतील तुरुंगात 14 वर्षांची सजा भोगत आहे. तरीही तेथील सरकारे खलिस्तानवादी लोकांच्या नियोजित सभेला अटकाव करण्याच्या हिंदुस्थानच्या विनंतीचा विचार करत नाहीत.

पंजाब स्वतंत्र झाल्यास स्वतंत्र कश्मीर निर्माण करणे सोपे जाईल अशी अटकळ बांधून कश्मीर फुटीरतावादी खलिस्तानला पाठिंबा देत आहेत. ज्या वेळेस खलिस्तानी दहशतवादी चळवळ हिंदुस्थानात सुरू झाली, त्यावेळी एक प्रमुख नेते व समर्थक जगजितसिंह हे कॅनडात राहत होते व अनिवासी हिंदुस्थानी होते. कॅनडामध्ये एका हिंदुस्थानी मंत्र्याचा खून करण्यात आला आणि आपले एक विमानही पाडले गेले. हिंदुस्थानविरोधी दहशतवादी देशाबाहेरही कटकारस्थाने करू शकतात. अशा प्रकारचे प्रयत्न अनेक देशांत होत आहेत. त्यावर लक्ष देऊन परदेशात त्यांच्या कारवाया कशा रोखायच्या हे हिंदुस्थानसमोर एक मोठे आव्हान आहे.

खलिस्तानी दहशतवादी भिंद्रनवाले यांचे उदात्तीकरण पंजाबमधील काही संस्थांकडून करण्यात येत आहे. पंजाबमध्ये अनेक ठिकाणी त्याकरिता पोस्टर लावले गेले. या कागदपत्रांमध्ये पंजाब पोलिसांना आवाहन करण्यात आले होते की, त्यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळू नयेत. या पत्रकातून त्यांना बंड करण्यास सांगत होते. खलिस्तानवाद्यांचे साहित्य, फोटो गुरुद्वाराबाहेर विक्रीला ठेवण्यात येते. मात्र अशा प्रकारे त्यांचा फोटो दरबार साहिबमध्ये लावण्याचा प्रयत्न हा पहिल्यांदाच होत आहे. त्यांचे उदात्तीकरण करून आणि खलिस्तानविषयी तरुणांना भडकवून खलिस्तानी दहशतवाद पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदुस्थानी शीख हे देशप्रेमी आहेत, पण काही वाट चुकलेल्या शिखांच्या संघटना अमेरिका, युरोप आणि कॅनडामध्ये तयार होत आहेत.

कॅनडात होणाऱया हिंदुस्थानविरोधी खलिस्तानी कारवायांवर लक्ष ठेवून त्याला विरोध झाला व्हायला हवा. दुसऱया देशामध्ये हिंदुस्थानविरोधी कारवाया करणाऱयांविरोधात कारवाई अनेक स्तरांवर करावी लागेल. इस्रायलचे गुप्तहेर खाते देशाच्या शत्रूंना इतर देशांत जाऊन पकडते तसे आपण करू शकतो का? मुत्सद्देगिरीच्या जोरावर अशा देशांना हिंदुस्थानविरोधी कारवायांवर लक्ष ठेवून त्या त्या देशातील कायद्यांतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल. खलिस्तान समर्थकांना आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत पकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. हिंदुस्थानविरोधी कारवाया या परदेशी भूमीवर होत असताना त्यावर लक्ष ठेवून त्यावर हल्ला व प्रतिहल्ला करणे गरजेचे आहे.

 ‘रेफरेंडम 2020’

स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीसाठी कॅनडा आणि युरोपात सुरू असलेल्या ‘रेफरेंडम 2020’ या मोहिमेचा सूत्रधार एक पाकिस्तानी लष्करी अधिकारी असल्याचे समोर येत आहे. पाकिस्तानी सैन्यातील चौधरीसाहब अर्थात लेफ्टनंट कर्नल शाहिद मोहंमद मलही हा अधिकारी युरोपात नव्याने सुरू झालेल्या खलिस्तानवाद्यांच्या हिंदुस्थानविरोधी आंदोलनाचा सूत्रधार आहे. चौधरीच्या पर्सनल कॉम्प्युटरमधून अनेक दस्तऐवज आढळून आले आहेत. ज्यामध्ये ‘रेफरेंडम 2020’ चळवळीचा विस्तृत आराखडा सापडला आहे. या मोहिमेच्या मागे अमेरिकेतील ‘सिख फॉर जस्टिस’ ही संस्था आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय याही मागे आहेच. गेल्या दोन वर्षांत पंजाबमध्ये झालेल्या हिंदू नेत्यांच्या हत्यांमध्येही या चौधरीचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. आयएसआयने युरोपात सुरू असलेल्या रेफरेंडम 2020ला ‘ऑपरेशन एक्स्प्रेस’ असे नाव देण्यात आले आहे. 6 जून 2020मध्ये हे ‘रेफरेंडम 2020’ सुरू करण्यात येणार आहे. याच दिवशी पंजाबमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ या मोहिमेला साडेतीन दशके पूर्ण होत आहेत.