लग्नाला येताय, मग ‘डायपर’ घालून या…! राजघराण्याचा पाहुण्यांना अनोखा आदेश

1

सामना ऑनलाईन । लंडन

यावर्षी मे महिन्यात इंग्लंडचा प्रिन्स हॅरी याचा विवाह अभिनेत्री मेगन मर्केल बरोबर शाहीपद्धतीने संपन्न झाला. हा लग्नसोहळा त्याच्या झगमगाटाबरोबरच लग्नाला आलेल्या पाहुणेमंडळींमुळे अनेक महिने चर्चेत होता. आता पुन्हा एकदा या लग्नावर चर्चा सुरू झाली आहे. पण ही चर्चा लग्नातील शाही थाटमाटाबदद्ल नसून लग्नात येणाऱ्या पाहुणे मंडळींना राजघराण्याने दिलेल्या आदेशाबदद्ल आहे. कारण लग्नाला येताना पाहुण्यांनी ‘डायपर’ घालून यावे असा आदेशच राजघराण्याने दिल्याचे समोर आले आहे. हा खळबळजनक खुलासा अभिनेत्री डायने मोर्गन (43) हिने केला आहे.

सुरक्षेच्या कारणावरून हा आदेश राजघराण्याने पाहुण्यांना दिला होता. लग्नसमारंभादरम्यान पाहुण्यांना शौचालयात जाण्यास बंदी होती. यामुळेच त्यांनी पाहुण्यांना डायपर घालून येण्याचा आदेश दिल्याचे मोर्गनने म्हटले आहे. प्रिन्स हॅरीच्या लग्नात जगभरातील नामांकित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. यात प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हीड बॅकहम, त्याची पत्नी व्हिक्टोरिया, हॉलीवूडचा सुपरस्टार जॉर्ज क्लूनी त्याची पत्नी अमल यासारखे अनेक दिग्गज सामील झाले होते. यासगळ्यांना शौचालयात जाण्यास मनाई करण्यात आली होती. एका रेडीओ शो मध्ये बोलताना मोर्गनने हा खुलासा केला आहे.

‘द सन’ने याबदद्ल वृत्त प्रसिद्ध केले असून त्यातील माहितीनुसार, ‘लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना चार तासासाठी तुम्ही शौचालय वापरु शकणार नाही. यामुळे तुम्ही डायपर घालून तयार होऊनच या. कारण लग्नसोहळा मध्येच सोडून तुम्ही बाहेर जाऊ शकत नाहीत’, असेही राजघराण्यातर्फे पाहुण्यांना सांगण्यात आल्याचे मर्केलने सांगितले आहे.