शिवसेनेची लोकसभेत मागणी, मुंबईतील पाच रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदला

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

मुंबई सेंट्रल, चर्नी रोड, एलफिन्स्टन रोड, करी रोड आणि सॅण्डहर्स्ट रोड या पाच रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे तातडीने बदलण्यात यावी, अशी जोरदार मागणी शिवसेनेने आज लोकसभेत केली.

मुंबई शहराचा विकास करण्यात मोलाचे योगदान दिलेले आणि मुंबईतील रेल्वे विकासासाठी महत्त्वाची कामगिरी करणारे जगन्नाथ शंकर शेट यांचे नाव पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल या रेल्वे स्थानकास देऊन त्यांचा गौरव करावा, अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत केली.

मुंबई सेंट्रलबरोबरच पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्नी रोड रेल्वे स्थानकाचे नामकरण गिरगाव रेल्वे स्थानक, एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाचे नामकरण प्रभादेवी रेल्वे स्थानक आणि मध्य रेल्वे मार्गावरील करी रोड स्थानकाचे लालबाग रेल्वे स्थानक आणि सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे डोंगरी रेल्वे स्थानक असे नामकरण करा, अशी मागणीही अरविंद सावंत यांनी केली.

लालबागमधील करी रोड, डोंगरीतील सॅण्डहर्स्ट रोड, गिरगावमध्ये चर्नी रोड आहे. येथील पत्ते आणि पोस्टाचे पिनकोड हे लालबाग, डोंगरी, गिरगावशी संबंधित आहेत. ते या नावाच्या रेल्वे स्थानकाशी संबंधित नाहीत याकडेही अरविंद सावंत यांनी लोकसभेचे लक्ष वेधले.