बीएस्सी नर्सिंगचा अभ्यासक्रम पाच जिल्ह्य़ांत सुरू करणार

सामना ऑनलाईन । मुंबई

केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्रात स्वतंत्र परिचर्या संचालनालय स्थापन करण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरू आहे. तसेच सर्व जीएनएम या अभ्यासक्रमाचे उन्नतीकरण करून त्या ठिकाणी बेसिक बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू केला जाणार असून पहिल्या टप्प्यात पाच जिल्ह्य़ांमध्ये त्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधान परिषदेत सांगितले.

राज्यात परिचर्या संचालनालय सुरू करणे, त्यांच्या धुलाई, आहार, गणवेश या भत्त्यांत वाढ करण्याबद्दलची लक्षवेधी सूचना विक्रम काळे यांनी मांडली होती. त्यावरील उत्तरात डॉ. दीपक सावंत यांनी जीएनएम अभ्यासक्रमाचे उन्नतीकरण करताना बीएस्सी नर्सिंगच्या पुढे एमएस्सी नर्सिंग सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. बीएस्सी नर्सिंगचे अभ्यासक्रम पहिल्या टप्प्यात ठाणे, नागपूर, नाशिक, सातारा आणि सिंधुदुर्गच्या पाच तालुक्यांत सुरू करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानंतर उर्वरित जिल्ह्य़ांत अभ्यासक्रम सुरू केले जातील.

नर्सेसच्या भत्त्यांमध्ये येत्या तीन महिन्यांत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे सांगून डॉ. दीपक सावंत यांनी परिचारिका अभ्यासक्रम आणि बाहेरील राज्यात नर्सिंगचे कोर्सेस करून आलेल्यांना राज्यात नोकरी देण्यासंदर्भातील प्रश्नांवर संबंधित आमदारांची बैठक घेण्याचे आश्वासन डॉ. दीपक सावंत यांनी दिले. या चर्चेत नागोराव गाणार, गिरीश गांधी यांनी भाग घेतला.