बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांना थकीत पगार मिळणार

सामना ऑनलाईन, मुंबई

बीएसएनएलच्या सर्व कर्मचाऱ्यांचा फेब्रुवारीचा थकीत पगार उद्या शुक्रवारी देण्यात येईल, अशी माहिती बीएसएनएलचे चेअरमन-व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी आज दिली. कर्मचाऱ्यांचे पगार लवकरात लवकर मिळावे यासाठी केंद्रीय दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांनी योग्य वेळी हस्तक्षेप केल्याबद्दल सिन्हा यांचा मी आभारी आहे, असे श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. बीएसएनएल आणि एमटीएनएल या सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारीचे पगार रखडले आहेत. एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांना पगार देता यावा यासाठी डॉटने आपल्याकडील 171 कोटींची थकबाकी दिली आहे. बीएसएनएलचे देशभरात 1.76 लाख, तर एमटीएनएलचे 22 हजार कर्मचारी आहेत. आगामी 5 ते 6 वर्षांत एमटीएनएलचे 16 हजार आणि बीएसएनएलचे 50 टक्के कर्मचारी निवृत्त होणार आहेत.