बीएसएनएल सेवेचा उडाला बोजवारा, टाळे ठोकण्याचा शिवसेनेचा इशारा

बीएसएनएलच्या समस्येवर शिवसेना पदाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांना घेराओ घालत जाब विचारला. (अमित खोत)

सामना प्रतिनिधी । मालवण

शहरासह तालुक्यात बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला आहे. गेले दोन महिने सुरू असलेल्या अनागोंदी व सतत खंडित होणाऱ्या सेवेबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारत नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकार्‍यांनी बीएसएनएल कार्यालयावर धडक दिली. यावेळी येत्या दोन दिवसात कारभार न सुधारल्यास कार्यालयास टाळे ठोकू असा संतप्त इशारा शिवसेनेच्या वतीने बीएसएनएल तालुका अधिकारी एस. आर. कसबे यांना देण्यात आला.

गेले दोन महिने शहरासह तालुक्यातील बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला आहे. याप्रश्‍नी दूरसंचार विभागाच्या अधिकार्‍यांचे लक्ष वेधूनही अद्यापपर्यंत त्यात सुधारणा झालेली नाही. त्यामुळे शिवसेना पदाधिकार्‍यांनी दूरसंचारच्या कार्यालयात अधिकार्‍यांना घेराव घातला. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यासह नगरसेवक नितीन वाळके, पंकज सादये, तृप्ती मयेकर, सुनीता जाधव, आकांक्षा शिरपुटे, बाबी जोगी, किरण वाळके, महेंद्र म्हाडगुत, अंजना सामंत, बाबू मांजरेकर, दीपा शिंदे, यशवंत गावकर, किशोर गावकर, दीपक मयेकर, तुळशीदास मयेकर, तपस्वी मयेकर उपस्थित होते.

यावेळी शिवसेना पदाधिकार्‍यांनी शहरात सुरू असलेल्या बीएसएनएलच्या अनागोंदी कारभाराचा पाढाच वाचला. कॉल ड्रॉपच्या समस्येने शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. थ्रीजी नेटवर्क नसल्याने नागरिकांसह व्यापार्‍यांचेही हाल होत आहेत. अन्य मोबाईल कंपन्यांचे कॉल व्यवस्थित सुरू असून बीएसएनलच्या बाबतीत कोणती समस्या निर्माण झाली आहे. असा प्रश्‍न शिवसेना पदाधिकार्‍यांनी उपस्थित केला. पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्यासमोर बीएसएनएलच्या अधिकार्‍यांनी समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु अद्यापही बीएसएनएलच्या कारभारात सुधारणा झालेली नाही.

जिओ कंपनीची सेवा सुरळीत सुरू आहे. परंतु बीएसएनएलची सेवा कोलमडली आहे. स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानात अ‍ॅप डाऊनलोड करणे महत्त्वाचे आहे. परंतु बीएसएनएलच्या भोंगळ कारभारामुळे अ‍ॅप डाऊनलोड होत नाहीत. त्यामुळे लोकांना दुसर्‍या कंपनीची कार्ड खरेदी करण्याची वेळ आली आहे. या सर्वांचा फटका पालिकेला स्वच्छ सर्व्हेक्षणात बसणार आहे असे नगराध्यक्ष यांनी सांगितले.

बीएसएनएलचे अधिकारी एस. आर. कसबे यांनी दूरध्वनीद्वारे वरिष्ठ अधिकारी एस. आर. भिसे यांच्याशी संपर्क साधला. भिसे यांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांना मालवणात येऊन बीएसएनलची निर्माण झालेली समस्या दोन दिवसात सोडविणार असल्याचे आश्वासन दिले.