मोदी सरकारचा अर्थसंकल्प पोकळ, गरीबांसाठी तरतूद नाही- लालुप्रसाद

4

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अर्थसंकल्पावरुन राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प पोकळ असून यात गरिबांसाठी काहीच तरतूदी केलेल्या नाहीत,असे लालूंनी म्हटले आहे. खासदार व माजी केंद्रीय मंत्री ई. अहमद यांच्या निधनानंतरही अर्थसंकल्प जाहीर करुन मोदी सरकारने असंवेदनशीलता व अमानवीयताच दाखवली आहे. मोदी हे हिंदुस्थानचे ट्रम्प आहेत. हे दोघे फक्त अडचणी आणतात,असेही लालूंनी म्हटले आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी मोदी सरकाराचा अर्थसंकल्प दिशाहीन, आधारहीन व निष्क्रीय असल्याचा दावा केला आहे. सरकारकडून देशाच्या भवितव्यासाठी कुठलीही तरतूद करण्यात आली नसून मोदी सरकार आपली विश्वासार्हता गमावून बसल्याच ममता यांनी टिव्टमध्ये म्हटले आहे.

कॉंग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खारगे यांनीही अहमद यांच्या निधनानंतर मोदी सरकारने  जाहीर केलेल्या अर्थसंकल्पावर आक्षेप घेतला आहे. खारगे यांनी मोदी यांच्यावर अहमद यांच्या मृत्यूची माहिती जाणूनबुजून लपवून ठेवल्याचा गंभीर आरोप केला आहे.

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या वर्षाचा अर्थसंकल्प शेरो शायरींचा बजेट असल्याची टीका केली आहे. या बजेटमध्ये गरिब जनता व शेतक-यांसाठी काहीच नव्हते. आम्हांला वाटलं मोदी धमाका करतील पण हा तर फुसका बार निघाला असं राहुल यांनी म्हटलं आहे.

कॉंग्रेस नेते मनिष तिवारी यांनी हे बजेट म्हणचे निव्वळ भाषणबाजी असल्याच म्हटल आहे. तसेच कॉंग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी या अर्थसंकल्पात देशाच्या सुरक्षेवरील खर्चावर सरकारने कोणतीही घोषणा केली नसल्याचं म्हटलं आहे. तसेच उत्तर प्रदेशमधून विधानसभा निवडणूक लढवणा-या मोदी सरकारला देणगीदार काय चेक आणि डिजिटल पेमेंटमधून पैसा पुरवत आहेत काय?,असा सवाल केला आहे.