म्हशीने घेतला पाच तोळे सोन्याचा घास!


सामना प्रतिनिधी । वडूज

सकाळी म्हशीला देण्यात आलेल्या पेंडीच्या खुराकामध्ये गेलेल्या पाच तोळे सोन्याच्या मंगळसूत्राचा घास तिने घेतला. ही गोष्ट वेळीच शेतकऱ्याच्या लक्षात आल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून गिळलेले मंगळसूत्र सुरक्षित बाहेर काढले.

खटाव तालुक्यातील मांडवे गावाजवळ सुनील मांडवे यांची वस्ती आहे. रक्षाबंधनाच्या सणासाठी मांडवे यांच्या बहीण साधना पाटील या माहेरी आल्या होत्या. रविवारी रात्री झोपताना चोरांच्या भितीने साधना यांनी त्यांचे पाच तोळे सोन्याचे मंगळसूत्र आणि दीड तोळय़ांचे नेकलेस घरातील पेंडीच्या पोत्यात लपवून ठेवले होते. आज सकाळी सुनील यांनी नेहमीप्रमाणे प्लॅस्टिक टपामध्ये म्हशीला पेंडीचा खुराक दिला. म्हशीने पेंड खाल्यानंतर सुनील यांना टपाच्या तळाशी गंठण आढळून आले. त्यांनी घरात चौकशी केल्यानंतर साधना यांनी गंठण आणि नेकलेस पेंडीच्या पोत्यात ठेवल्याचे सांगितले. त्यावरून म्हशीने मंगळसूत्र गिळल्याचा संशय आला.

घटनेची माहिती तालुका लघु पशु वैद्यकीय चिकित्सालयाचे सहायक आयुक्त डॉ. नितीन खाडे यांना देण्यात आली. डॉ. खाडे यांनी म्हैशीच्या पोटाची शस्त्रक्रिया करून सोन्याचे मनिमंगळसूत्र बाहेर काढले. याशिवाय म्हशीच्या पोटातून त्यांनी प्लास्टिक कागद, टेलिफोन वायर बाहेर काढली. सुमारे दोन ते अडीच तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. यावेळी डॉ. खाडे यांना डॉ. तानाजी खाडे, डॉ. प्रकाश बोराटे, यशवंत साबळे यांनी सहकार्य केले.

चोरांचा सुळसुळाट
खटाव तालुक्यातील मांडवे परिसरात चोरांचा सुळसुळाट सुरू आहे. वारंवार भुरटय़ा चोऱ्यांच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या भितीपोटीच रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या सुनील मांडवे यांची बहिण साधना पाटील यांनी त्यांचे सोन्याचे दागिने पेंडीच्या पोत्यात लपविले होते.