NDA ची सत्ता आल्यास मुसलमानांनी त्यांच्याशी हातमिळवणी करावी, काँग्रेस नेत्याचा सल्ला

172

सामना ऑनलाईन, बंगळुरु

एक्झिट पोलमुळे कर्नाटक काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. इथल्या काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांचे जाबीरपणे वाभाडे काढायला सुरूवात केली आहे. रोशन बेग यांनी के.सी.वेणूगोपाल यांना हुजरेगिरी करणारे म्हटले आहे. वेणूगोपाल यांनी केलेली हुजरेगिरी, सिद्धरमय्या यांचा उद्धटपणा आणि गुंडू राव यांच्या फ्लॉप शोमुळे काँग्रेसवर कर्नाटकात ही वेळ आली आहे असं बेग यांनी म्हटलं आहे. मला राहुल गांधी यांच्याबद्दल वाईट वाटतं असंही बेग म्हणाले आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बेग यांनी हे विधान केले आहे. इंडिया टुडे- माय इंडिया एक्झिट पोल यांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये कर्नाटकातील 28 लोकसभा जागांपैकी भाजपला 21 ते 25 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.

कर्नाटकात काँग्रेसने फक्त एका जागी मुसलमान उमेदवार दिला आहे. याबाबत रोशन बेग यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जर NDA सत्तेत परत आली तर मुसलमानांनी तडजोड करावी असा सल्लाही बेग यांनी दिला आहे. ‘गरज पडली तर मुसलमानांनी भाजपशी हातमिळवणी करावी, आपण एका पक्षाशी एकनिष्ठ राहू नये’ असं बेग यांनी म्हटले आहे. बेग यांच्या या विधानांमुळे तिथल्या काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत विचार सुरू केला आहे

बेग हे काँग्रेसमध्ये नाराज असून ते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे. त्यांना याबाबतही प्रश्न विचारण्यात आला, यावर त्यांनी गरज भासली तर मी हे पाऊल उचलेन असं म्हटलंय. बेग यांनी कर्नाटकातील काँग्रेसच्या अवस्थेला के.सी.वेणूगोपाल, माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि दिनेश गुंडू राव यांना जबाबदार धरले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या