उरणच्या दास्तान फाट्य़ावर उभारणार शिवरायांचे भव्य स्मारक

सामना प्रतिनिधी । उरण

हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिह्यातील उरणच्या दास्तान फाट्य़ावर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य स्मारक उभे केले जाणार आहे. ९२.५ फूट असलेले हे स्मारक रायगडच्या गौरवशाली परंपरेत मानाचा तुराच ठरणार असून यासाठी जेएनपीटीने ३० कोटींचा निधी मंजूर केला आहे. हे स्मारक उभे करतानाच तेथे विस्तीर्ण अशी आर्ट गॅलरीही तयार केली जाणार आहे. त्यामुळे इतिहासप्रेमींसाठी ही ‘शिवसृष्टी’ प्रेरणादायी ठरणार आहे.

उरण तालुक्यातील दास्तान फाटा येथील जेएनपीटीच्या मालकीच्या दोन एकर जागेत हे स्मारक उभारण्यात येणार आहे. या शिवस्मारक क्षेत्रात आर्ट गॅलरी बनविण्यात येणार आहे. या आर्ट गॅलरीमध्ये शिवरायांच्या जीवनावरील विविध प्रसंगांची, धातूची शिल्पे उभारण्यात येणार असून रायगडमधील थोर व्यक्तीची प्रासंगिक चित्रं आर्ट गॅलरीत लावली जाणार आहेत. या आर्ट गॅलरीमध्ये शिवकालीन वस्तूंचे म्युझियमही साकारले जाणार आहे. तसेच सांस्कृतिक आणि विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करण्यासाठी मिनी एमपी थिएटरही उभारण्यात येणार आहे. क्षुधा शांत करण्यासाठी अद्यावत कॅफेटेरियाबरोबरच दीड एकर क्षेत्रात फाऊंटन आणि उद्यानाचीही निर्मिती करण्यात येणार आहे. सुमारे ३० कोटी खर्चाचा हा महत्त्वांकांक्षी प्रकल्प पुढल्या वर्षी फेबुवारी २०१८ मध्ये प्रत्यक्षात पुर्णत्वास जाणार आहे. स्मारकाचे शिल्प बनविण्याचे काम पुण्याच्या चित्रकल्प आर्ट स्टुडिओ कंपनीला देण्यात आले आहे. शिव समर्थ स्मारकाचे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे.

असे असेल शिव समर्थ स्मारक
स्मारक उभारण्यासाठी २२ मीटर उंचीचे बिल्डिंग स्ट्रक्चर उभारण्यात येणार आहे. १६०० स्क्वेअर मीटर क्षेत्रात हे बिल्डिंग स्ट्रक्चर उभारण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्यावर २० मीटर उंचीचा समर्थ रामदास स्वामी आणि शिवरायांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. म्हणजे स्ट्रक्चरसह साधारणता ९२.५ फूट उंचीवर शिव समर्थ स्मारक बसविण्यात येणार आहे. इतक्या उंचीचे स्मारक परिसरातून कुठूनही दृष्टीस पडणार आहे.