देव तारी त्याला कोण मारी, वाघाशी झुंज देऊनही तो बचावला

सामना ऑनलाईन । कोंढाळी

देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय मेट येथील ग्रामस्थांना आला. येथील एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करूनही त्याने शर्थीची झुंज दिली आणि त्याच्या बैलांनी प्रसंगावधान राखत त्याच्या जीवाचं रक्षण केलं.

मेट येथे बहुतांश लोकांचा शेती व दुधाचा व्यवसाय आहे. त्यातीलच एक असलेले मनोहर जाणबा कुळमते (५०) हे आपल्या शेतात बैलजोडी घेऊन गेले होते. बैलांना चरण्यासाठी सोडल्यानंतर शेतात काम करणाऱ्या मनोहर यांच्यावर लपून बसलेल्या वाघाने हल्ला केला. मनोहर यांनीही न डगमगता वाघाशी झुंज द्यायला सुरुवात केली. ही झुंज मनोहर यांच्या बैलांनी पाहिली आणि मालकावर झालेला हल्ला पाहून त्यांनी वाघावर हल्ला चढवला. दोन बैलांनी असा अचानक हल्ला केल्यामुळे वाघ पळून गेला.

मनोहर यांच्या शेताच्या आसपास काम करणाऱ्या इतर शेतकऱ्यांनी त्यांना ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. प्रथमोपचारांनंतर त्यांना नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आलं आहे.