बुलेट ट्रेनच्या स्पीडला लाल ‘दिवा’, दिव्यातील भूमिपुत्रांचा कडाडून विरोध

1
Chandrakant Patil gives written answer about bullet train survey

सामना प्रतिनिधी । ठाणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गी लावण्यासाठी सर्व सरकारी यंत्राणा सुसाट वेगात कामाला लागली असताना दिव्यात मात्र त्याला लाल दिवा दाखवण्यासाठी दिवावासिय एकवटले आहेत. कोणतीही कल्पना न देता किंवा विश्वासात न घेता जिल्हाधिकारी कार्यालयाने बुलेट ट्रेनसाठी दिव्यात भूसंपादन करण्यास सुरुवात केली असल्याने येथील भूमिपुत्रांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. विकासाला विरोध नाही, पण गृहीत धरत असाल आणि बुलेट ट्रेन बळजबरी लादणार असाल तर सर्व शक्ती एकवटून लढा देऊ, असा संतप्त इशारा दिवावासीयांनी दिला आहे.

मुंबई-अहमदाबाद ही देशातील पहिली बुलेट ट्रेन भिवंडीमार्गे ठाणे तालुक्यातील सात गावांमधून वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) अशी धावणार असून, या मार्गावरून धावताना ती पालघर जिल्ह्यातील विरार, बोईसरप्रमाणे दिवानजीकच्या म्हातार्डी गावामध्येही थांबणार आहे. बुलेट ट्रेनच्या सुसाट वेगाचे हादरे बसू नये यासाठी ती ठाणे जिल्ह्यातून नवी मुंबईला वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भिवंडीतील १३ गावे आणि ठाण्यातील सात गावांखालून ही बुलेट ट्रेन धावणार असून त्यासाठी भिवंडी आणि दिव्यातील म्हातार्डी गावात थांबा देण्यात येणार आहे. त्यासाठी दिव्यातील म्हातार्डी, आगासन, शिळ, डावले इत्यादी गावांमधील जमिनी संपादन करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असून सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्वेक्षण सुरू झाले असले तरी त्याची साधी कल्पनाही जमीन मालकांना विंâवा भूमिपुत्रांना देण्यात आली नाही. त्यामुळे बुलेट ट्रेनला विरोध करण्यासाठी दिवावासीय एकवटले असून संघर्ष समिती स्थापन केली आहे.

> ठाणे तालुक्यातील शिळ, डावले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी परिसरातील सुमारे २० हेक्टर जागा अधिग्रहण केली जाणार आहे.
म्हातार्डी परिसरामध्ये ठाण्यातील बुलेट ट्रेनचा थांबा देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
 म्हातार्डी येथील ११.४४९७ हेक्टर जमीन घेण्यात येणार आहे.

झोळी रिकामीच
सुरुवातीला कोकण रेल्वेने यांची जमीन घेतली. याच गावांमधून दोन डीपी रोड जाणार आहेत. ठाणे महानगरपालिकेने ३७ एकरांची जमीन वेगवेगळ्या कारणांसाठी आरक्षित केली आहे. त्यात बुलेट ट्रेनच्या नावाखालीही सरकार आगासान, पडले, देसाई, म्हातार्डी अशा गावांतील लोकांची जमीन संपादित करणार आहे. ही जमीन शेतीसाठीही वापरली जात आहे. आतापर्यंत विविध प्रकल्पांसाठी भूमिपुत्रांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र योग्य मोबदला न मिळाल्याने त्यांची झोळी रिकामीच राहिली.