बैलगाडा शर्यतींचा धुरळा…

दादासाहेब येंधे

राज्य विधिमंडळाने राज्यात बैलगाडा शर्यतीची प्राचीन परंपरा असून अशा शर्यतींमुळे सांस्कृतिक प्रथांचे जतन होते, असा युक्तिवाद करीत प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध असलेल्या कायद्यातील सुधारणांना मान्यता दिली. त्यामुळे काही वर्षांपासून बंदी असलेल्या बैलगाडा शर्यतींचा मार्ग खुला झाला आहे; पण बैलांना या शर्यतींना वेदना किंवा यातना दिल्यास तीन वर्षे कारावास किंवा पाच लाखांच्या दंडाची शिक्षा होईल अशीही तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱयांना या निर्णयामुळे कर्जमाफीच्या निर्णयाइतकाच आनंद होईल, अशा भावना व्यक्त करीत विधानसभेत सरकारचे अभिनंदन करण्यात आले. यामुळे बैलगाडा शर्यतींचा थरार महाराष्ट्राच्या शिवारांमधून पुन्हा एकदा अनुभवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात सर्वदूर बैलांच्या शर्यतींची परंपरा नसली तरी कर्जबाजारी आणि शेतमालाच्या किमतीमुळे कोंडलेल्या ग्रामीण जीवनात तेवढीच एक गार झुळूक म्हणून याकडे पाहता येईल.

प्राण्यांच्या हक्कासाठी आततायीपणा करणारा एक मोठा वर्गही समाजात आहे. या वर्गाने बैलांच्या शर्यतींवर क्रौर्याचा शिक्का मारला आहे. या मंडळींचा दावा निराधार नसला तरी अतिरंजित आहे. मुक्या जनावरांचे हाल अशी भावनिक चर्चा जर करायची असेल तर रोजच्या सकाळच्या चहाच्या कपातल्या दुधाला पहिल्यांदा सुट्टी द्यावी लागेल. कारण गाई-म्हशीकडून जास्तीत जास्त दूध मिळावे म्हणून अत्याधुनिक डेअऱयांमधून जे ‘शास्त्रीय’ प्रकार केले जातात ते पाहिल्यावर त्याला क्रौर्य का म्हणू नये, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. नवजात वासराला चिकाचे चार थेंबही अशा डेअऱयांमधून मिळू दिले जात नाहीत. मांसाहाराची चटक म्हणून जिभेचे चोचले पुरविण्यासाठी खुलेआम होणाऱया विविध प्राण्यांच्या कत्तलींकडे डोळेझाक केली जाते.  यातील क्रौर्य कसे नाकारणार? ओझी वाहायला प्राणी पाहिजेत. करमणुकीसाठी पाळीव प्राणी पाहिजेत. मुंबईतील फोर्ट येथील बाजारात तर खुलेआम पाळीव प्राण्यांची विक्री होते. हे सर्व प्रकार क्रौर्याचे ठरत नाहीत का? हार-जीत या इर्षेतून काही कुप्रथा या पारंपरिक आनंदात घुसल्या असतील किंवा बैलगाडा शर्यत जिंकण्यासाठी बैलांना मद्य पाजणे, मारहाण करणे याचे समर्थन कुणी करणार नाही.

खरे तर शर्यतीचा बैल सांभाळणे हे सोपे काम नाही. शर्यतींच्या जातिवंत खिल्लारी बैलांची किंमत एखाद्या कारच्या किमतीपेक्षा कमी नसते. शर्यतींच्या खोंडांचा व्यायाम-खुराकावरचा खर्च लाखांमध्ये असतो. शर्यतींचा बैल तयार करण्यासाठी दूध, अंडी, पेंड, गव्हाचे पीठ, हरभरा-उडीद असा खुराक दिला जातो, याबरोबरच काजू-बदाम आणि तेल मालिशसाठी वेळ द्यावा लागतो. महत्त्वाचे म्हणजे बैलाला जीव लावावा लागतो. त्याशिवाय बैल एखाद्या बाणासारखा सुसाट उधळत नसतो. जत्रा-यात्रेच्या निमित्ताने वर्षातून दोन-तीन वेळा अशा स्पर्धा अनुभवण्याची मौज काही औरच असते. जास्तीत जास्त ही शर्यत दीड मिनिटात संपते. त्यामुळे त्यावर सरसकट क्रौर्याचा शिक्का मारणे हा आततायीपणा आहे. प्राणिप्रेमींनी शर्यतींना विरोध करण्याऐवजी शर्यतींना शिस्त लावण्याचा प्रयत्न करावा. स्पेनमधल्या ‘बुल फाइट्स’चे जगाला कुतूहल आहे. तसे ‘मार्केटिंग’ आपल्या बैल शर्यतींचेही व्हावे. महालक्ष्मी येथील रेसकोर्सवर होणाऱया घोडय़ांच्या ‘रेस’इतक्याच बैलांच्या शर्यतीही व्यावसायिक झाल्या तर यातून एक नवी ‘इंडस्ट्री’ तयार होऊ शकते, याचाही यानिमित्ताने विचार व्हावा. खेळाचा निर्भेळ आनंद उपभोगण्यास कोणाचीही हरकत असण्याचे कारण नाही. हे ध्यानात घेऊन निकोप वातावरणात शर्यती व्हाव्यात.