कुडाळला रंगली बैलगाडी सजावट, सुदृढ बैल-रेडा स्पर्धा! मिरवणुकीने वेधले लक्ष

कुडाळ शहर राष्ट्रीय काँग्रेस आयोजित दीपोत्सव 2022 निमित्त बुधवारी बैलगाडी सजावट, सुदृढ बैल व रेडा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहर बाजारपेठेतून काढण्यात आलेली सजविलेल्या बैलगाडी, सुदृढ बैल व रेडा यांची मिरवणूक लक्षवेधी ठरली. ढोलताशांच्या गजरात जिजामाता चौक येथून सायंकाळी मिरवणूकीला सुरुवात झाली. गांधीचौक, बाजारपेठ, पानबाजारमार्गे हॉटेल गुलमोहर अशी मिरवणूक काढण्यात आली. 10 बैलगाड्या, 25 ते 30 बैल व रेडे सजवून या मिरवणुकीत सहभागी होते. त्यामुळे ही स्पर्धा अधिक लक्षवेधी ठरली.

या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी राष्ट्रीय काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, जिल्हा चिटणीस प्रकाश जैतापकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, नगराध्यक्षा आफरीन करोल, न.पं.महिला व बालकल्याण समिती सभापती अक्षता खटावकर, जिल्हा बॅंक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते उल्हास शिरसाट, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष मंदार चंद्रकांत शिरसाट, शहराध्यक्ष चिन्मय बांदेकर, अल्संख्यांक सेलचे तरबेज शेख, महिला आघाडी तालुकाध्यक्षा सुंदरवल्ली स्वामी आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी आणि नागरीक उपस्थित होते.