पेणमध्ये मराठा समाजाच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद!

10

सामना प्रतिनिधी । पेण

सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पेण शहरातील व्यापारी, किरकोळ विक्रेत्यांनी आपापली दुकाने बंद ठेऊन प्रतिसाद दिला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे व इतर मागण्यांसाठी राज्यात मराठा समाजाचे आंदोलन पेटले असताना  सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रायगड बंदची हाक देण्यात आली. पेण मध्येही  मराठा समाजाच्या वतीने शहरातून रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले. त्या आवाहनाला पेणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी प्रथम पेण शहरातील शिवाजी चौकातील  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर धरमतर रोड, बाजारपेठ मार्गे शहरातून रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी एक मराठा, लाख मराठा, काकासाहेब अमर रहे, तुमचे बलिदान व्यर्थ जाणार नाही अशा घोषणा देण्यात आल्या.

या रॅलीत मराठा समाजाचे पेण तालुका अध्यक्ष प्रदीप चव्हाण, पेण शहर अध्यक्ष अनंत सावंत, सुनिल सत्वे, रुपेश कदम, मंगेश दळवी, बोरगाव सरपंच, सापोली सरपंच लहुशेट पाटील, नाना महाडीक, अविनाश पाटील, विजय कदम, सचिन शिगवण, वासुदेव पाटील, माजी नगरसेवक दिलिप लाड, मनोज पवार, सचिन साळुंखे आदींसह मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या बंदमुळे पेण एस.टी. स्थानकातील एस.टी वाहतुकीवर परिणाम होवुन पेण- खोपोली, पेण – पनवेल मार्गावरील एस.टी बसची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या