टीएमटीच्या पाच बसेस फोडल्या

सामना प्रतिनिधी । ठाणे

ठाणे शहरात टीएमटीच्या पाच बसेस जमावाने फोडल्या, तर कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण जिल्हाभरात ठिकठिकाणी निषेध करण्यासाठी सोमवारी रात्रीपासूनच जमाव जमू लागला. त्या जमावाने रास्ता रोको करत दगडफेकही केली. काही ठिकाणी पोलिसांनी संतप्त जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. सध्या वातावरणात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

डोंबिवलीत रास्ता रोको

सुमारे १०० ते १५० नागरिक शेलार नाका येथे जमले. या जमावाने निषेधाच्या घोषणा देत रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेडस् टाकून रास्ता रोको केला. त्यामुळे वाहतुकीची काही काळ कोंडी निर्माण झाली होती. पोलीस नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करत होते. मात्र जमाव शांत होत नव्हता. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला या दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले.

कल्याणमध्ये मोर्चा

कल्याण पूर्वमधील दुकानदारांनी दुकाने बंद केल्याने अनेक भागांत शुकशुकाट होता. आंदोलकांनी नेतीवली पत्रीपुलाजवळ रास्ता रोको केल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. तणावाची स्थिती लक्षात घेता श्रीराम टॉकीज, काटेमानवली नाका, पूना लिंक रोड, गणपती चौक ते काटेमानवली नाका, कर्पेवाडी, सिद्धार्थनगर, म्हसोबा चौक, तिसगाव नाका आदी परिसरातील व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद केले.

उल्हासनगरात बंद

भीमा-कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ उल्हासनगरातील रिक्षांसह दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली. प्रथम शहरात जेवढे आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले आहेत तेथून रिक्षा, दुकाने बंदपासून सुरुवात झाली. हळूहळू त्याचे लोण संपूर्ण उल्हासनगरात पसरले. आंबेडकरी जनतेने शांततेने बंदच्या दिलेल्या आवाहनाला व्यापारी, दुकानदार यांनी साथ दिली.

खर्डीत निषेध रॅली

भीमा-कोरेगाव येथे विजय स्तंभाला मानवंदनेसाठी आलेल्या भीमसैनिकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत मोखाडय़ात बस स्थानकापासून तहसील कार्यालयापर्यंत मोखाडय़ातील बौद्ध बांधव व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध रॅली काढण्यात आली.