बिटकॉईनच्या नावाखाली व्यापाऱ्याला 8 कोटी 46 लाखांचा चुना

सामना प्रतिनिधी, अलिबाग

गुंतवणूकीतून मोठ्या लाभाचे आमिष दाखवून मुंबईतील मीरारोड येथील एका व्‍यापाऱ्याला आणि त्‍याच्‍या मित्राला सुरतमधील एकाने 8 कोटी 46 लाख 15 हजार 664 रुपयांना चुना लावल्‍याची घटना उघडकीस आली आहे. राकेश विरजीया असे या ठकाचे नाव असून त्‍याच्‍याविरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

मुंबईतील मिरारोड परीसरात राहणारे परेशभाई कारिया हे आपल्‍या मित्रासह ऑगस्‍ट 2017 मध्‍ये अलिबाग येथे फिरायला आले होते. त्‍या मित्राने त्‍यांची ओळख सुरत येथील राकेश विरजीया यांच्‍याशी करून दिली. त्‍यावेळी राकेश याने या दोघांना बिटकॉईनमध्ये असलेली क्रिप्टोकरन्सी ही हेक्टाईन आणि झेक्सोको कॉईनमध्ये परावर्तित केल्‍यास तुम्‍हाला मोठा फायदा होईल, असे आमिष दाखवले. लॅपटॉपवर याची सर्व खोटी माहिती दिली.

मोठ्या लाभाच्‍या अमिषाने दोघे भुलले. दोघांनी त्‍याच्‍या कल्‍पनेला होकार दिला. परंतु झेक्सोको कॉईन संबंधी दाखवलेली वेबसाईट बंद पडलेली असताना वेबसाईट वरील बनावट स्क्रिनशॉटची कॉपी तसेच बिकॉईनची विक्री करून सदरची रक्कम झेक्सोको कॉईनमध्‍ये गुतंवणूक प्रक्रिया सुरू असल्यासबंधीचे कागदपत्र या दोघांना दाखवले. मात्र, याचा कुठलाही लाभ परेशभाई व त्‍यांच्‍या मित्रांना मिळाला नाही. याची माहिती घेतली असता प्रत्‍यक्ष गुंतवणूक न करता ही सर्व रक्‍कम राकेश विरजीया याने परस्‍पर काढून घेतल्‍याचे त्‍यांच्‍या लक्षात आले. तेव्‍हा या दोघांनी राकेशकडे पैशांची मागणी केली परंतु राकेशने त्‍यांना पैसे तर दिले नाहीच, उलट ठार मारण्‍याची धमकी दिली.

याप्रकरणी परेशभाई कारिया यांनी अलिबाग पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली असून राकेश विरजीया याच्‍याविरुद्ध फसवणुकीचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक ए. जे. शेख या गुन्‍ह्याचा तपास करीत आहेत.