बीव्हीजीचे अध्यक्ष हनमंतराव गायकवाड यांना लोकनेते मारुतरावजी घुले पाटील स्मृती पुरस्कार

bvg-hanmant-gaikwad

सामना प्रतिनिधी । नेवासा

नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने देण्यात येणारा सन २०१८ चा लोकनेते मारुतरावजी घुले पाटील स्मृती पुरस्कार बी.व्ही.जी. ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हनमंतराव गायकवाड यांना जाहीर करण्यात आला आहे. ज्ञानेश्वरसहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी ही माहिती दिली.

नगर येथे जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये याबाबत अधिक माहिती देताना घुले-पाटील म्हणाले, नेवासा तालुक्यातील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या जयंती निमित्त दरवर्षी कारखाना कामगारांचे सांस्कृतिक मंडळाच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना लोकनेते मारुतरावजी बुले पाटील स्मृती पुरस्कार देण्यात येतो. ५१ हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या वर्षाच्या पुरस्कारासाठी बी.व्ही.जी. ग्रूपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हनमंतराव गायकवाड यांची निवड करण्यात आलेली आहे. गायकवाड यांनी जिद्द आणि अपार मेहनतीच्या जोरावर अडचणींवर मात करत भारत विकास ग्रूप (बी.व्ही.जी.) ची स्थापना केली. घरांची देखभाल व्यवस्था, रुग्णालयाची देखभाल१०८ क्रमांकाची रुग्णवाहिनी सेवा, औद्योगिक कचरा व्यवस्थापन, बांधकाम, सेंद्रीय शेती या क्षेत्रात भरीव काम उभे केले. हिंदुस्थानसह अनेक देशात ते ही सेवा दिली जात आहे. या माध्यमातून हजारों व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांच्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.

१५ सप्टेंबर २०१८ रोजी लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांचे ८८ व्या जयंती निमित्त कारखाना कार्यस्थळावर होणाऱ्या विशेष कार्यक्रमात ज्ञानेश्वर उद्योग समुहाचे प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार डॉ.नरेंद्रजी घुले पाटील यांचे हस्ते व अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.