दिवंगत कृषीमंत्री फुंडकरांच्या जागेसाठी 3 ऑक्टोबरला निवडणूक जाहीर

राजेश देशमाने । बुलढाणा

राज्याचे दिवंगत कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी येत्या 3 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. तशी घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्ली येथे केली आहे.

राज्याचे दिवंगत कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने 31 मे 2018 रोजी निधन झाले होते. त्यामुळे विधान परिषदेची जागा रिक्त झाली. त्या रिक्त जागेसाठी निवडणूक आयोगाने आज कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची तारीख 14 ते 22 सप्टेंबर असून अर्जांची छाननी 24 सप्टेंबर तर अर्ज मागे घेण्याची तारीख 26 सप्टेंबर आहे. मतदान 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 4 घेण्यात येणार आहे. मतमोजणी त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. पांडुरंग फुंडकर यांची मुदत 24 एप्रिल 2020 पर्यंत होती. परंतु आकस्मित निधनामुळे ही निवडणूक होत आहे. त्याचसोबत कर्नाटक राज्यातील के. एस. ईश्वरआप्पा, डॉ. जी. परमेश्वरा, व्ही. सोमन्ना यांनी 16 मे 2018 रोजी राजीनामा दिल्यामुळे या तीन विधान परिषदेच्या जागेसाठी सुद्धा वरील निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुका घेण्यात येत आहे.