केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाच्या हालचाली सुरू

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल होण्याची चर्चा सुरू असतानाच आज रात्री कौशल्य विकासमंत्री राजीवप्रताप रुडी यांनी राजीनामा दिला. त्यांच्यापाठोपाठ जलसंपदामंत्री उमा भारती यांनी राजीनामा देऊ केला असून आणखी पाच  मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी धाव घेतली. त्यामुळे मंत्रिमंडळात होऊ घातलेल्या फेरबदलांवर आणि विस्ताराबाबत त्यांच्यात चर्चा होणार असल्याचे सांगितले जात होते.

राजीवप्रताप रुडी यांना राजीनामा देण्याची सूचना अमित शहा यांनीच केली होती. तुमची नवी जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे त्यांना शहा यांनी सांगितले.

रुडी यांच्याकडे पक्षाची संघटनात्मक जबाबदारी देण्यात येणार असल्याचे कळते. रुडी आणि त्यांच्यापाठोपाठ राजीनाम्याची तयारी दाखवलेल्या उमा भारती यांच्या खात्यांच्या कामगिरीवर पंतप्रधान मोदी समाधानी नव्हते, असे भाजपच्या गोटात बोलले जाते.

उमा भारती, रुडी यांच्याबरोबरच केंद्रीय मंत्री संजीव बाल्यान, निर्मला सीतारमन, कलराज मिश्र, महेंद्रनाथ पांडेय यांनीही राजीनामे देऊ केले आहेत. पांडेय यांची उत्तर प्रदेशच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी गुरुवारीच नियुक्ती करण्यात आली आहे तर कलराज मिश्र यांनी वयाची पंचाहत्तरी पार केली आहे.

केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री गजपती राजू आणि कृषिमंत्री राधा मोहन सिंग यांची खाती बदलली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मंत्रिमंडळाच्या विस्तारात बिहारमध्ये भाजपसोबत सरकार स्थापन केलेल्या नितीशकुमार यांच्या जदयूला दोन मंत्रीपदे देण्यात येतील, अशी चर्चा आहे.

चर्चा काय?

  • येत्या शनिवारी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद शुक्रवारी तिरुपतीच्या दौऱयावर जाणार आहेत.
  • २ सप्टेंबरला ते राजधानीत परततील.
  • शनिवारी २ सप्टेंबरला संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘ब्रिक्स’साठी रवाना होणार आहेत.
  • फेरबदलाबाबत आम्हाला काहीच ठाऊक नसल्याचे राष्ट्रपती भवनातून सांगण्यात आले.