आंबटशौकीन चोर! या चोराने जे चोरलंय ते ऐकून तुम्हीही हसाल…

1

सामना ऑनलाईन । कॅलिफोर्निया

आजच्या सायबर युगात चोरीच्या अजबगजब घटना घडतात. मात्र, अमेरिकेतील चोरीची घटना ऐकल्यावर ‘असं करत्यात व्हंय’ असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. सायबरचोरीद्वारे कोट्यवधींची रोकड लांबवण्यात येते. दरोड्यात सोने- चांदीचे दागिने लंपास होतात. मात्र, अमेरिकेत घडलेल्या या चोरीने चोराचा नेमका काय फायदा होणार होता, असा प्रश्नही पोलिसांनी पडला आहे. तसेच चोराकडून पकडलेल्या मुद्देमालाचे काय करायचे असा प्रश्नही पोलिसांसमोर उभा आहे. या चोराने तब्बल ३६२ किलोच्या लिंबांची चोरी केली आहे.

अमेरिकेत कॅलिफोर्निया परिसरात शेताततून फळे आणि भाज्या चोरण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यास सुरुवात केली. एका वाहनाला थांबवून तपासणी केली असता पोलिसांनी वाहनात ३६२ किलो लिंबू आढळले. हे लिंबू घेऊन फियर्रोस नावाची 69 वर्षांची व्यक्ती पळून जाण्याच्या प्रयत्नात होती. त्याने चोरलेले सर्व लिंबू ताजे होते. पोलिसांनी गाडीसह त्याला अटक केली असून त्याला तुरुंगात पाठवले आहे. तर या लिंबूंचे काय करायचे असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. फियर्रोस या लिंबूचे नेमके काय करणार होता, याबाबत त्याने चौकशीत काहीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे पोलिसांचा संभ्रम आणखी वाढला आहे. नेटकऱ्यांनी या घटनेवर अनेक मिम्स आणि जोक बनवायला सुरुवात केली आहे.

या भागात फळे आणि भाज्यांची चोरी वाढल्याच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांच्या हाती हा लिंबू चोर सापडला आहे. इतर फळे आणि भाज्या चोरण्यातही त्याचा हात आहे काय, याची चौकशी करण्यात येत आहे. स्पेनमध्ये गेल्या वर्षी एका गाडीत सुमारे चार हजार संत्री आढळली होती. चालकाला चोरीप्रकरणी अटक केली असता आपण वेगवेगळ्या ठिकाणांहून आपण फिरून येत आहोत. संत्री आवडत असल्याने वेगवेगळ्या ठिकाणच्या संत्र्याचा आस्वाद घेण्यासाठी त्या खेरदी केल्याचा दावा चालकाने केला होता. अशा घटनांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे.