ओरल सेक्समुळे घशाचा कर्करोग होतो का?

प्रातिनिधिक फोटो

-डॉ. शिशिर शेट्टी, कर्करोग तज्ञ, अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई

मुखमैथुन (ओरल सेक्स) हा शब्द प्रसारमाध्यमांमध्ये गाजला तो अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन व मोनिका ल्युइन्स्की यांच्या १९९८ मधील प्रकरणामुळे. त्यानंतरच्या काळात खास प्रौढांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम डिजिटल माध्यमांमधून सादर होण्यास सुरुवात झाली. चित्रपट, टीव्हीवरील मालिका यांमधून लैंगिक स्वरुपाची, त्यातही मुखमैथुनाची दृष्ये दाखविण्यात येऊ लागली. अर्थात मुखमैथुनाविषयी अनेक जणांना पुरेशी माहिती नसते. आता तर मुखमैथुनामुळे घशाचा कर्करोग होऊ शकतो, असा शास्त्रीय अहवाल अमेरिकेतील एका संस्थेने प्रसिद्ध केला आहे. हा कर्करोग होण्यास मुखमैथुनाची कृती कारणीभूत नसते, तर ही कृती करीत असताना ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) हा विषाणू घशात गेल्यामुळे कर्करोग होण्याचा धोका निर्माण होतो.

हिंदुस्थानात डोके व मान या भागात कर्करोग होण्याचे प्रमाण भयंकर आहे. या कर्करोगांमुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या हिंदुस्थानात जगाच्या २८ टक्के आहे, तर आग्नेय आशियाच्या तुलनेत ते प्रमाण ७१ टक्के इतके आहे. तंबाखू, सुपारी व मद्य यांच्या सेवनामुळे हे कर्करोग होतात. त्यातच आता भर पडली आहे घशाचा मध्यभाग (ओरोफारिंजिअल) आणि जीभ यांच्या कर्करोगाची. या दोन्ही कर्करोगांचे कारण असते एचपीव्ही विषाणू, जे मुखमैथुनामुळे पसरतात.

एचपीव्ही विषाणूमुळे गर्भाशयाचा कर्करोग होतो, ही बाब आतापर्यंत सर्वांना ज्ञात होती. आता हे विषाणू घशाच्या कर्करोगासही जबाबदार असतात, हेही अनेक संशोधनांमधून सिद्ध झाले आहे. ‘एचपीव्ही-१६’ हा त्यातील सहसा आढळणारा विषाणू आहे. तो पुरूष व स्त्रिया या दोघांवरही परिणाम करतो. ज्या व्यक्ती अनेक जणांशी मुखमैथुन करतात, त्यांना ‘ओरोफारिंजिअस’ कर्करोग होण्याचा धोका खूपच जास्त असतो. मुखमैथुनातून ‘एचपीव्ही’चे इन्फेक्शन झाले, तर घशाचा कर्करोग होतो, हे अनेकांना माहीत नसते. या कर्करोगाच्या प्राथमिक लक्षणांकडे साधारणतः दुर्लक्ष केले जाते, त्यामुळे सुरुवातीच्या काळात त्याच्यावर उपचार होऊ शकत नाहीत. ‘एचपीव्ही’ चे इन्फेक्शन झाल्याची लक्षणे कधीकधी दिसतही नाहीत. त्यामुळे त्याचे पर्यवसान अनेक वर्षांनी कर्करोगात झाल्यावरच त्याचा सुगावा लागतो. रुग्णाचे लैंगिक जीवन वा सवयी कशा आहेत, हे विचारण्याचा प्रघात नसल्याने, तसेच मुखमैथुन केल्याचे वा करीत असल्याचे कोणी डॉक्टरांना सांगत नसल्याने, हा कर्करोग झाला असल्याचे डॉक्टरांनाही लवकर समजून येत नाही व त्यामुळे त्वरीत उपचार करण्याचा मार्गही उरत नाही.

एचपीव्ही हा विषाणू शरीरातील ओलसर भागावर परिणाम करतो. एका संशोधनातून असे आढळून आले, की ६ टक्के पुरुषांच्या व १ टक्के महिलांच्या घशात कर्करोगास कारणीभूत असणारे ‘एचपीव्ही’चे इन्फेक्शन झाले होते, मात्र त्यातून प्रत्यक्ष कर्करोग झाल्याचे प्रमाण पुरुषांमध्ये हजारांत सात जणांना व महिलांमध्ये हजारांत २ जणांना इतकेच होते. ही माहिती नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलचे कर्करोग तज्ञ डॉ. शिशिर शेट्टी यांनी दिली.

एचपीव्ही विषाणूमुळे घशाचा कर्करोग झालेले महिन्याला १० ते १५ रूग्ण आपण पाहतो व यातील बहुसंख्य रुग्णांचे वय ४० ते ४५ वर्षे इतके असते, असेही डॉ. शेट्टी यांनी सांगितले. घसा व ओरोफारिजिअल कर्करोगाची लक्षणे ही बऱ्याचदा तंबाखू व दारू यांच्यामुळे होणाऱ्या कर्करोगाच्या लक्षणांसारखीच असतात. बरा न होणारा अल्सर किंवा जखम, अन्न चावताना तोंडात वेदना, ते गिळताना घशात वेदना, जिभेवर व तोंडात अन्यत्र पांढरे डाग, तोंडाला आतून आलेली सूज, सततचा खोकला ही या कर्करोगाची काही लक्षणे आहेत. यातील काही लक्षणे ही हवामान बदलामुळे घशाला झालेल्या साध्या जंतुसंसर्गाप्रमाणेच दिसतात. त्यामुळे अनेकदा रुग्णांची व डॉक्टरांची फसगत होते. ‘एचपीव्ही’मुळे घशाला झालेल्या कर्करोगाचे निदान त्यामुळे वेळीच होत नाही. त्या तुलनेत तंबाखूच्या सेवनामुळे झालेल्या कर्करोगाचे निदान लवकर होऊ शकते. या कर्करोगाच्या लक्षणांमध्ये, श्वासाला येणारी दुर्गंधी, आवाजातील बदल वा घोगरेपणा किंवा श्वासोच्छवासातील अडथळे यांचा समावेश होतो.

पाश्चिमात्य देशांमध्ये एक विशेष बाब शास्त्रज्ञांना आढळली. तेथे तंबाखूच्या सेवनाचे प्रमाण गेल्या काही वर्षांत खूपच कमी झाले आहे. तरीदेखील डोके व मान या भागातील कर्करोगाचे प्रमाण तेवढ्या प्रमाणात कमी झालेले नाही. त्याची कारणे शोधली असता, तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण त्या देशांमध्ये कमी झाले होते, मात्र त्याचवेळी ‘एचपीव्ही’शी संबंधित घशाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले.

कर्करोगाच्या उपचार पद्धतींमधील सर्वात आधुनिक स्वरुपाची, इम्युनोथेरपी, ही सध्या डॉक्टर्स व रूग्ण या दोघांकडून उपचारार्थ वापरली जात आहे. कर्करोगावर मात करण्यासाठी ही प्रभावी पर्यायी उपचारपद्धत आहे, हे दोघेही जाणतात. डोके व मान या अवयवांचे काही कर्करोग मानवाच्या रोगप्रतिकारक शक्तींवर विपरीत परिणाम करतात. कर्करोगाच्या पेशींशी लढण्याची अंगभूत शक्ती यात नाहिशी होत जाते. ‘इम्युनोथेरपी’ च्या औषधांमुळे शरीरात असलेल्या या रोग प्रतिकारक मूळ पेशींची ताकद वाढवली जाते. यातूनच कर्करोगाला अटकाव होतो.

‘इम्युनोथेरपी’च्या औषधांमुळे ट्युमरच्या गाठींचा आकार ३० टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळले आहे. सुमारे २० टक्के रुग्णांवर हा परिणाम दिसून आल्याचे अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या ‘अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजी’च्या परिषदेत सांगण्यात आले. ‘इम्युनोथेरपी’ने ट्युमरच्या गाठी कमी झाल्याचे इतरही काही संशोधनात आढळून आले आहे. ‘इम्युनोथरपी’ च्या उपचारांचा फायदा हा अमेरिकतच नव्हे, तर हिंदुस्थानीय रुग्णांवरही दिसून आला आहे.

डोके व मान यांच्याशी संबंधित कर्करोगाशी मुकाबला करण्यात अनेक अडथळे येतात. चांगली आरोग्यसेवा न मिळणे, दारिद्र्य, निरक्षरता ही सामाजिक कारणे, तसेच कर्करोगाचे निदान उशीरा होणे ही यातील मोठी आव्हाने आहेत. लैंगिक जीवनामध्ये सुरक्षित साधनांचा उपयोग करणे, कंडोम्स वापरणे तसेच जोडीदाराचे आरोग्य चांगले असणे या बाबी अतिशय महत्त्वाच्या असल्याचे डॉक्टर सांगतात. लैंगिक अवयवांना एचपीव्हीची लागण झालेली नाही, हे नियमित तपासून घेणे, त्यासाठी आरोग्य चाचण्या करून घेणे यातून केवळ स्वतःचीच नव्हे, तर आपल्या जोडीदाराच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाते. एचपीव्ही विषाणूवर लस घेणे हा आणखी एक चांगला पर्याय आहे. यातून केवळ घशाचाच नव्हे. तर गर्भाशयाचाही कर्करोग टाळता येतो. सर्व प्रकारच्या लशी घेण्याने शरीराला ‘एचपीव्ही-१६’ व ‘एचपीव्ही-१८’ या दोन प्रकारच्या विषाणूंपासून संरक्षण मिळते. त्यामुळे कर्करोगाच्या धोक्यावर मात करता येते.