‘सनबर्न क्लासिक’ची मान्यता रद्द करा; हिंदू जनजागृती समितीची मागणी

3

सामना ऑनलाईन । पणजी

वागातोर येथे २३ आणि २४ फेब्रुवारी या कालावधीत ‘सनबर्न क्लासिक’ हा ‘ईडीएम्’ महोत्सव होत आहे. या महोत्सवाची मान्यता रद्द करून गोवा ‘ईडीएम्’ मुक्त करावे, अशी मागणी येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे. आज येथील आझाद मैदानावर हिंदुत्त्वनिष्ट संघटनांनी निदर्शने करत ही मागणी केली.

‘सनबर्न क्लासिक’सारखे ‘ईडीएम्’ महोत्सव युवा पिढीला व्यसनाधीन बनवणारे आणि पाश्‍चात्त्य विकृतीचे उदात्तीकरण करणारे आहेत. गोव्याची युवा पिढी व्यसनाधीन झालेली आणि पाश्‍चात्त्य विकृतीच्या आहारी गेलेली सरकारला चालते का? ‘सनबर्न क्लासिक’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे. गोवा सरकारने सध्या समुद्रकिनार्‍यावर आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करण्यास बंदी घालण्याचा एक स्तुत्य निर्णय नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला आहे. ‘सनबर्न क्लासिक’ हा महोत्सवही वागातोर या समुद्रकिनार्‍याजवळ होणार आहे. अशा प्रकारच्या ‘ईडीएम्’ महोत्सवात मद्य खुलेआम विकले जाते. सरकार स्वतःचाच बंदी आदेश मोडून ‘सनबर्न क्लासिक’सारख्या ‘ईडीएम’ महोत्सवात मद्यविक्री करण्यास परवानगी कोणत्या आधारावर देणार आहे ? अमली पदार्थ व्यवसाय होणार्‍या ‘ईडीएम्’ला सरकार प्रोत्साहन का देते? असे सवाल यावेळी करण्यात आले. सनबर्नच्या आयोजकांनी हिंदुस्थानच्या राष्ट्रध्वजाचा देखील अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात मये ग्रामरक्षा दल, गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी या संस्था सहभागी झाल्या होत्या. तर गोपाळ बंदीवाड, शुभा सावंत आणि सत्यविजय नाईक यांची भाषणे झाली.