देवदर्शनावरून परत येताना कार अपघात, ४ जण ठार १ जखमी

सामना प्रतिनिधी । उदगीर

हुमनाबादजवळ झालेल्या कार आपघातामध्ये उदगीर येथील चार जण ठार झाले आहेत. गाणगापूर येथील देवदर्शन करुन परत येत असताना हा अपघात झाला. अपघातामध्ये हनमंत बालाजी लोणे (२३), अनुसयाबाई बालाजी लोणे (५०), प्रियंका नारायणराव नागमपल्ले (२०) आणि सावित्रीबाई नारायणराव नागमपल्ले (४०) यांचा मृत्यू झाला आहे. सुलोचनाबाई बालाजी बिरादार (३२) असे जखमी महिलेचे नाव आहे.

हनमंत लोणे हे इंडिगो कार (क्र. एम. एच. २६ व्ही. ५९००) मधून आपली आई अनुसयाबाई, नियोजित वधु प्रियंका, होऊ घातलेली सासु सावित्रीबाई आणि मावसबहीण सुलोचनाबाई यांच्यासह गाणगापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून परत येत असताना शनिवारी सकाळी हुमनाबाद तालुक्यातील बसवंतपूर चौरस्त्याजवळ त्यांची कार एका पुलावरुन खाली कोसळली. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर हनमंत यांच्या मावसबहीण सुलोचनाबाई बिरादार जखमी झाल्या आहेत.