नाशिकजवळ मोठा शस्त्रसाठा जप्त; मुंबईतील तिघांना अटक

सामना प्रतिनिधी । नाशिक

चांदवड टोलनाक्यावर पोलिसांनी गुरुवारी रात्री २५ रायफल, १७ रिव्हॉल्व्हर,२ पिस्टल यासह ४ हजार १४२ जिवंत काडतुसे असा मोठा शस्त्रसाठा एका बोलेरो गाडीतून हस्तगत केला. अंडरवर्ल्डशी संबंधित सराईत गुन्हेगार मुंबईतील शिवडी येथील बदयू जमान अकबर बादशहा, सलमान अमानुल्ला खान व जीपचालक वडाळा येथील नागेश बनसोडे अशा तिघांना अटक केली आहे, त्यांना २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

यातील मुंबईतील रहिवासी बदयू जमान अकबर बादशहा याच्यावर मुंबईसह ठिकठिकाणी दरोडे, खून, प्राणघातक हल्ले असे सुमारे सत्तर गुन्हे दाखल आहेत. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे तो अडीच वर्षे एका गुह्यात जेलमध्ये होता. जप्त करण्यात आलेला शस्त्र्ासाठा उत्तर प्रदेशातील बांदा येथील मेसर्स न्यू पंजाब आर्म या दुकानातील आहे, त्यावर त्या दुकानाचे शिक्केही आहेत. या दुकानात दरोडा टाकून हा साठा लुटल्याचा गुन्हा बांदा येथे दाखल आहे. बादशहा ही शस्त्र अंडरवर्ल्डला विकणार होता, असा संशय आहे.

पोलिसांनी आमीष धुडकावले
चांदवड टोलनाक्यावर ही जीप ताब्यात घेताच बादशहाने पैशांचे आमीष दिले, मात्र, पोलिस त्याच्या भूलथापांना बळी पडले नाहीत. मालेगावजवळ वाकी शिवारात गुरुवारी रात्री एका पेट्रोलपंपावर डिझेल भरून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बोलेरोने पळ काढला, याची माहिती मालेगाव आणि चांदवड पोलिसांना सतर्क पेट्रोलपंप कर्मचाऱयांनी दिली. पोलिसांनी पाठलाग करून ही जीप चांदवड टोलनाक्यावर अडविली. जीपच्या झडतीत ही शस्त्रास्त्र सापडली.