…रात्र महत्त्वाची

>>डॉ. अप्रतिम गोएल, सौंदर्यतज्ज्ञ

दिवसभर पावसाचे तडाखे, प्रदूषण आणि सूर्यप्रकाश डोळ्यांना दिसत नसला तरी त्याची अतिनीलकिरणं त्वचेला हानी पोहोचवीतच असतात. या सर्वांमध्ये आपल्या त्वचेचे खर्‍या अर्थाने पोषण होते ते रात्री. त्यामुळे झोपण्यापूर्वी त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे ठरते.

दैनंदिन व्यग्र जीवनशैलीत दिवसाप्रमाणे रात्रीच्या वेळी त्वचेची काळजी घेण्यास हलगर्जीपणा करतात. काहींना तर रात्रीच्या वेळी त्वचेचे सौंदर्य टिकवायचे असते याची जाण नसते. दिवसाच्या तुलनेत रात्री त्वचेचा पोत सुधारण्याचं काम होत असतं. कारण झोपेत आपल्या त्वचेलाही विश्रांती मिळते. यासाठी झोपताना मॉईश्चरायझर, नाईट क्रिम, रिप्लेनिशिंग क्रीम, सेरम यांचा वापर करता येतो. तसेच रात्री झोपताना शक्यतो चेहरा क्लिझिंग मिल्कने स्वच्छ करून झोपावे.

 

झोपताना त्वचेची काळजी

  • कोणत्या त्वचेकरिता कोणते नाईट क्रीम वापरणे योग्य आहे, याविषयी वैद्यांना विचारूनच क्रीमची निवड करा. कोणतेही क्रीम आपल्या मनाने ठरवून वापरू नका. यासाठी तुमच्या त्वचेचा पोत आणि लावले जाणारे क्रीम याचा त्वचेवर कसा परिणाम होतोय किंवा होईल तेही पाहा.
  • रात्री झोपताना वापरण्याची सर्व उत्पादने तुमच्या त्वचेच्या प्रकारावर अवलंबून असतात. त्वचा तेलकट किंवा अक्रे असलेली असेल तर ज्या क्रीममध्ये जास्त पाणी असेल अशी क्रीम वापरा. मात्र ते वारंवार वापरायचे की नाही यासाठी वैद्यांचा सल्ला घ्या, कारण याच्या अतिवापरामुळे मुरमेही येऊ शकतात.
  • महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कोणत्या शहरात राहता, यावरही कोणते नाईट क्रीम वापरायचे अवलंबून असते. उदा. दिल्लीसारख्या कोरड्या हवेच्या ठिकाणी राहणार्‍या थिकर (दाट)नाईट क्रीम तसेच ज्यामध्ये मॉइश्चरायझर, जीवनसत्त्व सी, ई, सायक्रोजेनॉल असे गुणधर्म असणारे क्रिम वापरण्याचा सल्ला दिला जातो. तर मुंबईत राहणार्‍यांसाठी लाईट नाईट क्रिम उपयुक्त ठरते.
  • पर्यावरणाचाही विचार नाईट क्रिम वापरताना करावा. मुंबईसारख्या उष्ण प्रदेशात तुम्ही राहात असाल, मात्र कार्यालयात दिवसभर एसीमध्ये बसत असाल तर तुम्हाला थिकर नाईट क्रिमची आवश्यकता आहे. जे लोक फिरतीचं काम करत असतील तर त्यांच्यासाठी एसपीएफ (सनप्रोटेक्शन फॅक्टर) असलेले क्रिम आवश्यक आहे.

 

झोपताना करायचे घरगुती उपाय

  • रात्री बदाम भिजवून सकाळी त्याची पेस्ट करावी. ती संत्र्याच्या रसात मिक्स करून लावावी.
  • रोज रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटे वेळ काढून संपूर्ण अंगाला अभ्यंग तेलासारखे त्वचेला स्निग्धता देणारे तेल लावावे. यामुळे त्वचेला आतून-बाहेरून पोषण मिळते.
  • रात्री झोपताना साय किंवा तूप घेऊन त्यामध्ये चंदन घालून मालिश केल्याने त्वचेला तेज मिळतं.
  • दररोज झोपण्यापूर्वी मेकअप स्वच्छ करूनच झोपावे. गरजेनुसार क्लिनिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर करावे. क्लिनिंगमुळे मेकअप, प्रदूषण, धूळ त्वचेवरून निघून जाते. मॉइश्चरायझरमुळे त्वचेला ओलावा मिळतो. टोनिंगमुळे चेहरा उत्साही बनतो.
  • रोज रात्री कापसाच्या बोळ्यावर गुलाबजल चेहर्‍याला लावून झोपावे.

 

त्वचेची नियमित काळजी घेताना

चेहरा स्वच्छ धुणे, मेकअप काढणे आणि सौम्य क्रब वापरणे या क्रिया नियमित करायला हव्यात. चेहर्‍यासाठी अल्ट्रासोनिक क्रबर वापरल्यास तो जास्त परिणामकारक ठरतो. कोमट पाण्याने चेहरा धुवा.