नागपूरमध्ये बालगुन्हेगारांच्या पुर्नवसनासाठी केअर युनिटची स्थापना

सामना प्रतिनिधी  । नागपूर

बालगुन्हेगारांना पुन्हा सामाजाचा घटक बनविण्यासाठी तसेच त्यांचे संरक्षण करण्यासाठी नागपूर पोलिस कटिबद्ध आहे. त्यासाठीच सामाजिक सुरक्षा विभागांतर्गत ‘केअर’ युनिट सुरू करण्यात आले आहे. या ‘केअर’ च्या माध्यमातूनच त्यांना संधी देण्यात येणार असून त्यासाठीच हे केंद्र तयार करण्यात आले आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले. ते शनिवारी छावणीतील पटेल बंगला येथील ‘केअर’ केंद्राच्या उद्घाटनावेळी बोलत होते. यावेळी बाल न्यायालयाच्या न्यायाधीश बेदरकर, सहआयुक्त रविंद्र कदम यांच्यासह पाचही परीमंडळातील पोलीस उपायुक्त उपस्थित होते.

“भविष्यात होणार्‍या शिक्षेचा किंवा परिणामाचा विचार न करता क्षणिक रागातून घडलेल्या गुन्ह्यातील बालगुन्हेगारांना भविष्यात चांगले घडविण्यासाठी सर्वांनी समोर येणे काळाची गरज आहे. कारण याच मुलांमधून शासकीय अधिकारी, पोलिस किंवा मोठे उद्योजक घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज त्यांच्या चुका माफ करून त्यांना समाजाचा घटक बनविणे आवश्यक आहे” असे डॉ. उपाध्याय यांनी सांगितले. एखाद्या मुलाच्या हातून नकळतपणे जर गुन्हा घडला तर त्याच्याकडे आरोपी म्हणून पाहता येणार नाही असे सांगून त्यांनी त्यासाठी कोणती परिस्थिती कारणीभूत आहे, याचा अभ्यास केला तर मुलांमध्ये गुन्हेगारीची भावना निर्माण करण्यासाठी पोषक वातावरण तयार होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. परंतू समाजात वाढत असलेली कृप्रवृत्ती नष्ट करण्याची गरज त्यांनी यावेळी प्रतिपादीत केली. सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास त्या मुलांमध्येसुद्धा बालपण लपलेला साधारण मुलगा दिसू शकतो असे सांगून चांगले विचार आत्मसात करा, शिक्षण घ्या आणि अभ्यास करा, शारीरिक विकासासाठी खेळाकडे वळा, तुमच्या अज्ञानाचा कुणी फायदा घेऊ देऊ नका, भविष्यातील धोके ओळखून पोलिसांना मित्र बनवा, असा सल्लाही यावेळी डॉ. उपाध्याय यांनी दिला.