स्वप्नांच्या मागे…


>> फाल्गुनी पवार, बदलापूर

कॉलेजमध्ये जाण्यापूर्वी म्हणजे साधारण दहावीत असताना कागदाच्या छोट्य़ा छोट्य़ा वस्तू बनवायचे. शाळेत फक्त कागदाची होडी किंवा फार तर घर करायला शिकवलं जातं. पण मला त्यापेक्षा वेगळं काहीतरी करायची खूप इच्छा असायची. तोच माझा प्रयत्नही असायचा. त्यातून मी तेव्हाच वेगवेगळ्या वस्तू बनवायचे… पण आईबाबा म्हणायचे काय उगाच वेळ घालवतेस… त्यापेक्षा अभ्यास कर… मग अभ्यास सांभाळूनच ड्रीमकॅचर करायला लागले. छान छान वस्तू बघायला मला लहानपणापासूनच आवडायचं, पण तेव्हा विंडो शॉपिंगव्यतिरिक्त मी काही करू शकत नव्हते. बाजारात फिरून वेगवेगळ्या वस्तू पाहून त्या आपल्याला करता येतील का हाच विचार माझ्या मनात असायचा… मग घरी येऊन त्या करून बघायचे.

दहावीत होते तेव्हा वस्तू बनवल्या की एकतर त्या कुणाला तरी प्रेझेंट म्हणून द्यायचे किंवा मग २०, ३० किंवा ४० रुपयांमध्ये विकायचे.. ड्रीमकॅचरमुळे माझ्या हातात बऱ्यापैकी पैसा खुळखुळायला लागला. आता तर माझं कॉलेजही नुकतंच याच वर्षी संपलंय. टीवाय पूर्ण केलंय… गेल्या तीनेक वर्षांतच मी ड्रीमकॅचरचा माझा स्वतःचा व्यवसायच सुरू केला आहे. आता पूर्णपणे याच व्यवसायात बुडून जायचं ठरवलंय… लहान मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत ड्रीमकॅचर शिकवण्याची शिबिरंही घेते मी. त्यात ३ ते १० वर्षे वयातील मुलांना छोट्य़ा वस्तू बनवायला शिकवते. मुळात मला बसून राहायला आवडत नाही. शांत बसवत नाही. आणखी काय वेगळं करता येईल ते पाहाते. हा कीडा हळूहळू वाढतच गेलाय. आता पूर्णपणे यातच स्थिरावलेय. आईवडिलांचाही आता मला पूर्ण पाठिंबा आले. पोरगी काहीतरी करतेय… त्यात तिला समाधान मिळतंय. पण जमतंय तेवढंच कर… असं त्यांचं सांगणं असतं. मी त्यांना कामाला लावते. तेही ड्रीमकॅचर आनंदाने करतात.
ऑर्डर असेल तर त्यांची खूप मदत होते. फेसबुक, व्हॉट्सअपवर माझ्या कामाबद्दल शेअर करते आणि नवनव्या ऑर्डर्स मिळवते.

हां… माझी आणखी एक आवड आहे. मी वयाच्या चौथ्या वर्षापासून नृत्य शिकतेय. बदलापूरलाच रचना नृत्य विद्यालयात दहावीपर्यंत नृत्य शिकले. माझं अरंगेत्रमही झालंय. पण दहावीनंतर रूईया कॉलेजात ऍडमिशन मिळाली. तेथे अपडाऊन करावं लागायचं म्हणून नृत्यासाठी वेळ मिळत नव्हता. म्हणून ते सोडलं. आता डॉ. संध्या पुरेचा यांच्याकडे भरतनाट्य़म शिकतेय. त्यांच्या कॉलेजमध्ये मी बी.ए. फस्ट ईयर पूर्ण केलंय. आता सेकंड इयर करतेय. वेगळ्या वाटेवरचे छंद तरुणाईला नेहमीच खुणावतात. आपला अभ्यास सांभाळून निवडलेली वेगळी वाट आम्हालाही सांगा… छायाचित्रासहित.

आमचा पत्ता
Gen Next, शेवटचे पान, दै. ‘सामना’, सद्गुरू दर्शन,
नागू सयाजी वाडी,
दै. ‘सामना’ मार्ग,
प्रभादेवी, मुंबई-25 [email protected] वरही पाठवता येईल.