आजा नचले!

पाश्चात्त्य नृत्य तरुणाईला आवडणारी शैली. यात करीअर करता येते.नृत्याचे अनेक प्रकार आहेत. कथ्थक, भरतनाटय़म, कुचिपुडी, ओडिसी, मणिपुरी असे शास्त्रीय तर रुंबा, बॅले, रुसी बॅले, आधुनिक बॅले, टँगो, साल्सा, रॉक ऍण्ड रोल ट्विस्ट असे काही पाश्चात्त्य नृत्यप्रकार आहेत. सोबतच सध्या बॉलिवूड किंवा कंटेम्पररी नृत्यप्रकारातही करीयरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. पोलंड, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, झेकोस्लोव्हाकिया आणि रुस अशी सर्व पाश्चात्त्य देशांची स्वतंत्र नृत्यशैली आहे. प्रत्येक देशाच्या संस्कृतीप्रमाणे त्या देशाची नृत्यकला विकसित झाली आहे. मुंबई विद्यापीठात, सरोज खान यांच्या अकॅडमीमध्ये पाश्चात्त्य आणि कंटेम्पररी नृत्याचं शिक्षण दिलं जातं. त्याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रात अनेक गुरू वैयक्तिक मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे हा नृत्यप्रकार शिकायचा असल्यास प्रवेश घेण्यापूर्वी नीट चौकशी करावी.

आवश्यक गुण
– प्रचंड मेहनत घेण्याची तयारी, दृढ निश्चय आणि योग्य, सक्षम शारीरिक क्षमता हवी.
– ही कला संपादन करण्यासाठी समर्पण, त्याग, आवश्यक सहनशक्ती, ऊर्जा, हावभाव इत्यादी गुणांची आवश्यकता असते.
– पाश्चात्त्य नृत्याचे अनेक प्रकार आहेत. कोणता नृत्यप्रकार आवडतो, तो शिकण्यावर तरुणांनी भर द्यावा. जेणेकरून तो पुढे इतरांनाही शिकवणे सोपे जाईल.

प्रशिक्षण संस्था
– पाश्चात्त्य नृत्यकलेशी संबंधित इतर विषयात करीअर करायचे असल्यास काही पर्याय उपलब्ध आहेत. ‘ट्रिनिटी कॉलेज ऑफ लंडन’ (http://www.trinitycollege.com/site/?id=1585) यांच्यातर्फे ‘डिप्लोमा इन डान्स टीचिंग अँड लर्निंग’ व ‘एटीसीएल (कंटेम्पररी डान्स)’ हे दोन अभ्यासक्रम घेतले जातात.

संधी
– सिनेमा, नाटक यासाठी नृत्यदिग्दर्शन करण्याची संधीही मिळू शकते. हल्ली लग्नामध्ये संगीताचा कार्यक्रम करण्याची लाट आलेली आहे. त्यासाठी तसेच अनेक शाळांतील स्नेहसंमेलनासाठीही नृत्यदिग्दर्शक नेमले जातात.
– डान्स थेरपीस्ट म्हणूनही करीअरच्या उत्तम संधी आहेत. लिखाणाची आवड असेल तर माध्यमांमध्ये नृत्याविषयी लिखाण किंवा नृत्य समीक्षक म्हणूनही काम करता येते.
– नृत्य निर्मिती संस्थांत काम करता येते किंवा स्वतःची संस्थाही काढता येऊ शकते.

पात्रता आणि वय
– नृत्य ५-६ व्या वर्षापासून शिकण्यास सुरुवात करावी.
– बॅले नृत्य शिकण्यासाठी वयाच्या ८-९व्या वर्षापासूनच नृत्य शिकण्यास सुरुवात करावी.
– बारावीनंतर पदवी, पदव्युत्तर, पी.एचडी, डिप्लोमा असे कोर्सही करता येऊ शकतात.