पत्रकारितेची सृजनवाट


ज्या विद्यार्थ्यांना जगभरात घडणाऱ्या घडामोडी, बातम्या तसेच नवनवीन घटना समजून घेण्याची आणि त्या लिहिण्याची आवड आहे, असे विद्यार्थी पत्रकारितेत आपले भविष्य घडवू शकतात.
पत्रकारितेत भविष्य घडवण्यासाठी कोणत्याही शाखेतून १२वी पास होणे आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थी आपल्या इच्छेनुसार पत्रकारितेतील पदवी, पदविका किंवा सर्टिफिकेट कोर्स करू शकतात. पदवी प्राप्त केल्यानंतर पत्रकारितेचा कोर्स केल्यास त्याचा विशेष फायदा होतो. कारण पदवीनंतर पत्रकारितेशी संबंधित पीजी डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन, डिप्लोमा इन पब्लिक रिलेशन असे कोर्स करता येतात. पदविका प्राप्त केल्यानंतर पत्रकारितेत एमफील किंवा पीएचडीही करता येते.

निवेदक
जगभरातील बातम्या आपल्या खास शैलीत श्रोत्यांना समजतील असे सोप्या भाषेत सांगणे म्हणजे निवेदन. बातम्यांचे निवेदन करणे हाही पत्रकारितेच्याच कामाचा एक भाग आहे. ज्यांना दृकश्राव्य माध्यमांची आवड असून ज्याचे वक्तृत्व व वाणी स्वच्छ आहे, ते पत्रकारितेच्या या क्षेत्रात काम करू शकतात.

मुख्य कोर्सेस
– बॅचलर इन मास कम्युनिकेशन
– पीजी डिप्लोमा इन ब्रॉडकास्ट
– एमए इन जर्नालिझम
– डिप्लोमा इन जर्नालिझम
– जर्नालिझम अँण्ड पब्लिक रिलेशन
– डिप्लोमा इन मास मीडिया

पत्रकारितेच्या कामाचे स्वरूप
या क्षेत्रात फील्ड आणि डेस्क असे दोन्ही ठिकाणी काम करावे लागते. फील्डवर काम करणाऱ्यांना विविध बीटवरील वार्तांकन करावे लागते. याकरिता पत्रकार होण्याऱ्यांना आपला जनसंपर्क वाढवणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या संस्था, कार्यालये इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्या लोकांची माहिती, त्यांचे फोन नंबर स्वतःजवळ ठेवावे लागतात. पत्रकार परिषदेला जाणे, मुलाखत घेणे, नेमून दिलेल्या ठिकाणचे वार्तांकन करणे ही कामे पत्रकाराला करावी लागतात. तसेच बातम्या लिहिणे, मजकूर संपादन करणे याकरिता पत्रकाराचे भाषेवरही प्रभुत्व असावे लागते. यासाठी पत्रकारितेत करियर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सतत वाचन करणे आणि सुरू असलेल्या घडामोडींची माहिती ठेवणे महत्त्वाचे आहे.