करीअरची कलात्मक वाट; कुंभारकला अर्थात पॉटरी

सामना ऑनलाईन, मुंबई

कुंभारकाम हा पारंपरिक व्यवसाय… माठ, पणती, कुंडय़ा, शोभेची मातीची भांडी अशा कितीतरी वस्तूंना कुंभाराला आकार द्यावा लागतो. मातीतून साकारणाऱया वस्तूंची निर्मिती करण्याच्या कलेची ज्यांना आवड आहे, त्यांनी कुंभारकाम नक्कीच शिकावे. स्वतःची नोकरी किंवा व्यवसाय करूनही ही कला जोपासता येते. शिवाय  उत्तम संधी मिळाल्यास ही कलाच तुमचा व्यवसायही बनून जाईल.

कुंभारकामाला कलात्मकतेची जोड दिली, तर व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात. यासाठी मातीचे प्रकार, तिच्यातील गुणधर्म, मातीच्या वस्तू भाजण्याचे तंत्रज्ञान या कृती शिकल्याने स्वतःची मूर्तिकला विकसित करता येते. कुंभारकाम किंवा मातीकाम ही आनंद देणारी कला आहे. माती, हवा, पाणी, प्रकाश आणि अग्नी या सर्व निसर्गनिर्मित तत्त्वांचा ही कला शिकणाऱया विद्यार्थ्याला अनुभव येतो, मात्र यासाठी जिद्द, चिकाटी, संयम, कलात्मक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे.

कुंभारकामाचं महत्त्व

चित्रकला, रंगकाम, भरतकाम, संगीत, नृत्य अशा अनेक कलांप्रमाणेच मातीकाम किंवा कुंभारकाम ही सांस्कृतिकता जोपासणारी कला आहे. सांस्कृतिकदृष्टय़ा आपल्या देशाचं वेगळेपण, पारंपरिकता आणि सौंदर्य जपण्याची ताकद याही कलेत आहे.

आवश्यक गुण

  • चाकावरचे किंवा कोणत्याही प्रकारचे मातीकाम करणे ही एक कला आहे, चाकावर मातीचा गोळा ठेवण्यापासून एखादं भांड, मडकं किंवा वस्तू तयार करण्याचं कौशल्य आत्मसात करावं.
  • सतत सराव करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करावे.
  • पारंपरिकतेला अधुनिकतेची जोड देणाऱयांची आवश्यकता आहे.
  • कुंडय़ा, बरण्या, विविध आकाराच्या वाटय़ा तसेच मोरपंखी पाने, पानांचे कँडल स्टँड अशा प्रकारच्या कलात्मकता जोपासणाऱया वस्तूंची सतत निर्मिती करण्याचा ध्यास.
  • मातीचा अभ्यास, जाण असणारा.

शिकवणाऱया संस्था

  • सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, डॉ. डी. एन. रोड, धोबी तलाव, छत्रपती शिवाजी टर्मिनस, फोर्ट
  • ‘आकार’ संस्था जि. रायगड, ता. इंदापूर
  • इंद्रधनुष्य विद्यापीठ, संभाजीनगर