‘त्या’ शिवीगाळप्रकरणी भाजपच्या पाशा पटेल यांच्यावर गुन्हा दाखल

सामना प्रतिनिधी । लातूर

भाजपचे माजी आमदार पाशा पटेल यांच्यावर विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार विष्णू बुरगे यांना अश्लिल शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हाभरातील पत्रकारांच्यावतीने पाशा पटेल यांचा निषेध व्यक्त केला आहे.

राज्याचे कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष आणि भाजपचे माजी आमदार पाशा पटेल यांनी विश्रामगृहावर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पत्रकार परिषद सुरू होण्यापुर्वी महाराष्ट्र १ या वृत्तवाहिनीचे पत्रकार विष्णू बुरगे यांनी पाशा पटेल यांना प्रश्न विचारला. त्यामुळे चिडलेल्या पाशा पटेल यांनी थेट संबंधित पत्रकाराची औकात काढली शिवराळ भाषेत, अश्लिल शिवीगाळ केली तसेच बघून घेण्याची धमकी दिली. हा सारा प्रकार तिथे उपस्थित असणाऱ्या एकाने मोबाईलमध्ये चित्रीत केला.

पाशा पटले यांनी केलेल्या शिवीगाळ आणि दमदाटीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यानंतर सर्वांनी पाशा पटेल यांचा निषेध करण्यास सुरुवात झाली. लातूर जिल्ह्यातील सर्वच तालूक्यातील पत्रकारांच्या संघटनांनी पाशा पटेल यांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. पत्रकार विष्णू बुरगे यांनी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरु पाशा पटेल यांच्याविरुध्द कलम २९४,५०४,५२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.