शिवसेनेच्या पाठपुराव्यास यश, महापालिकेच्या माजी अधिकाऱ्यासह पेट्रोलपंप मालकावर गुन्हा

सामना प्रतिनिधी । नालासोपारा

गोखिवरे येथील टी जंक्शनवर पेट्रोलपंप सुरू करण्यास परवनागी देणाऱ्या वसई-विरार महापालिकेच्या माजी अधिकाऱ्यासह पेट्रोलपंप मालकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. पालिकेचे तत्कालीन उपसंचालक वाय. शिवा रेड्डी व पेट्रोलपंपाचे मालक गिरीश कामदार यांच्यावर वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दोघांनाही अटक केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.

पेट्रोलपंप कुठे सुरू करायचा याबाबत सरकारचेच काही नियम आहेत. मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवून गोखिवरे येथील टी जंक्शनवर सर्रासपणे पेट्रोलपंप सुरू करण्यास परवानगी दिली. शिवसेनेचे नगरसेवक धनंजय गावडे यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. एवढेच नव्हे तर महापालिकेपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला. बेकायदेशीरपणे गिरीश कामदार यांना पेट्रोलपंप सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर गावडे यांनी रितसर तक्रार केली. हे प्रकरण उघडकीस येऊन वर्ष उलटले तरी महापालिकेने मालकाला एमआरटीपीची नोटीसही पाठवली नाही.

याप्रकरणी ४ जुलै २००५ रोजी सिडको प्रशासनाने सदर पेट्रोलपंपास टी-जंक्शनचेच कारण देत परकानगी नाकारली होती. तसेच २८ डिसेंबर २००७ रोजी महाराष्ट्र शासनाच्या नगरकिकास किभागानेदेखील एका सुनाकणीमध्ये सिडको प्रशासनाच्या निर्णयास दुजोरा देऊन सदर पेट्रोलपंपाची परकानगी फेटाळली होती. असे असतानाही महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त किशोर बोर्डे यांनी नियमबाह्य पद्धतीने त्रिसदस्यीय समिती स्थापन करून पेट्रोलपंपास परकानगी देण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सुचकिले होते. या भ्रष्ट कारभारात तत्कालीन उपसंचालक वाय. शिवा रेड्डी, नगररचना विभागाचे तत्कालीन सल्लागार सुरेश व्ही. सुर्वे यांचादेखील सहभाग होता. बेकायदा पेट्रोल प्रकरणात मालक गिरीश कामदार व तत्कालीन अधिकारी वाय. शिवा रेड्डी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असला तरी कठोर शिक्षा मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शिवसेनेचे नगरसेवक धनंजय गावडे यांनी दिला आहे.